अशोक चव्हाण (Photo Credits: PTI)

येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Elections) च्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्षाकडून आपले उमेदवार घोषित झाले आहेत. सध्या देशात मोदी विरोधी लाट चांगलीच उसळली असल्याने अनेक छोटे मोठे पक्ष एकत्र येऊन भाजप विरुद्ध ठाकले आहेत. राज्यात आज काँग्रेस-राष्ट्रवादीने (Congress-NCP)  संयुक्त पत्रकार परिषद घेवून महाआघाडीची घोषणा केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनुक्रमे 26 आणि 22 जागांवर लढणार आहेत. तर दोन्ही पक्षांकडे असणाऱ्या प्रत्येकी 2-2 जागा काँग्रेस आघाडीतील मित्र पक्षांना सोडण्यात येणार आहेत. महाआघाडीत पक्ष आणि संघटना मिळून एकूण 56 जण आहेत.

दोन्ही पक्षाकडून सोडण्यात आलेल्या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमानी या पक्षांचा देण्यात आल्या आहेत. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, राजू शेट्टी हे नेते उपस्थित होते. मात्र राधा कृष्ण विखे पाटील या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नसल्याने चर्चेला उधाण आले. सुजय विखे पाटील यांना काँग्रेसने नगरची जागा सोडली नसल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसवर नाराज आहेत असे बोलले जात आहे. (हेही वाचा: भाजप श्रेष्टींनी दिग्गजांचे तिकीट कापले, चर्चित चेहऱ्यांचे मतदारसंघ बदलले; एलके आडवाणी, शत्रुघ्न सिन्हा, शहानवाज हुसेन यांना धक्का)

दरम्यान, शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरातून होणार आहे. उद्या कोल्हापुरात तपोवन मैदानावर मोठ्या सभेचे आयोजन केले गेले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने या सभेचा भाग व्हावे यासाठी शहरातील प्रमुख चौकात 10 स्क्रीन्स लावण्यात येणार आहेत.