Maharashtra Police Recruitment 2022: महाराष्ट्र पोलीस दलात होणार 7 हजार पदांची भरती, तपशील घ्या जाणून
Maharashtra Police | (File Photo)

राज्याच्या पोलीस दलात (Maharashtra Police Force) काम करण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बादमी आहे. राज्य सरकार लवकरच गृहविभागातर्फे पोलीस भरती (Police Recruitment 2022) प्रक्रिया राबवत आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी वेळी तब्बल 7 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. राज्यात अनेक तरुण पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात. त्या सर्वच तरुणांसाठी हे अत्यंत दिलासादायक वृत्त आहे.

गृहविभाग राबवत असलेल्या 7 हजार पदांसाठीच्या पोलीस भरती प्रक्रिये संदर्भात लवकरच जाहीरात काढली जाईल. ही भरती जून महिन्यात पार पडली जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गृह विभाग तयारीला लागला असून जवळपास सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे. ही भरती विविध टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांची भरती करणे अपेक्षीत आहे.  (हेही वाचा, पोलिस भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी परीक्षार्थीची अजब युक्ती; पहा Viral Video)

राज्य सरकार यापूर्वीच पोलीस भरती प्रक्रिया राबवणार होते. मात्र, मध्येच कोरोना महामारी आली. त्यामुळे भरती प्रक्रियेत काहीसा खंड पडला. ती पुढे ढकलावी लागली.त्यामुळे मधल्या दोन वर्षांच्या काळात कोणत्याच प्रकारे पोलीस भरती झाली नाही. पोलीसभरती आज ना उद्या होईलच या आशेवर राज्यभरातील हजारो तरुण तयारी करत असतात. त्यामुळे हे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे डोळे नेहमीच या भरतीकडे लागलेले असतात. त्यामुळे आता उशीरा का होईना भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे तयारी करत असलेल्या तरुणांकडून समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलीस भरती 2019 बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सांगितले की, 2019 च्या भरती प्रक्रियेनुसार 5200 पदे भरली जाणार होती. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्याही दिल्या जात असल्याचे वळसे पाटील म्हणले. त्यांना अधिवेशन काळात प्रश्न विचारण्यात आला होता.