Mumbai: शुक्रवारी दुपारी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) दक्षिण नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. कॉलरने पोलिसांना गुरूवार, 23 फेब्रुवारी रोजी मुंबई हार्बरवर 90 किलो एमडी आणि स्फोटके उतरवण्यात आल्याची माहिती दिली. कॉलरने सांगितले की, शहरातील जेजे हॉस्पिटल, भिंडी बाजार आणि नळ बाजार भागात बॉम्बस्फोटांसाठी स्फोटकांचा वापर केला जाणार आहे.
फोन करणाऱ्याला त्याचे नाव आणि पत्ता विचारला असता त्याने माहिती देण्यास नकार दिला. तसेच, याबाबत अधिक अचूक माहिती विचारली असता, त्यांनी अस्पष्ट उत्तर देत फोन ठेऊन दिला. (हेही वाचा -Jalna: लिंगपीसाट नवरदेवाचा होणाऱ्या पत्नीवर लग्नाच्या बस्त्या दिवशीच लैंगिक अत्याचार, हत्याकरुन झाला पसार, वाचा पुढे काय घडलं)
सदर माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक दक्षिण नियंत्रण कक्ष, अनुप डांगे व दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. दिलीप सावंत यांना तात्काळ कळविण्यात आले. मुंबई शहर हे नेहमीच दहशतवादी संघटना आणि हल्ले यांच्या प्रमुख लक्ष्यांमध्ये असते हे लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्तांनी दक्षिण प्रादेशिक विभागांतर्गत सर्व बंदर परिसर, लँडिंग पॉइंट, गुप्त ठिकाणे, संवेदनशील आणि गर्दीची ठिकाणे इत्यादी ठिकाणी सुरक्षा आणि दक्षतेचे आदेश दिले.
अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार, सर्व बंदर परिसर, लँडिंग पॉईंट, संवेदनशील आणि गर्दीची ठिकाणे इत्यादींची सदर माहितीच्या अनुषंगाने झडती घेण्यात आली. कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही आणि कॉलरने खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले.
खोटी माहिती देणारा कॉलर हा नागपूरचा रहिवासी असून त्याला पालघर जिल्ह्यातील डहाणू येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर जेजे मार्ग पोलिस ठाण्यात आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.