पुणे: बस कंडक्टरचा पराक्रम, 8 तासात फाडली 1 लाख 1 हजार 402 रुपयांची तिकिटे
PMPML (Photo Credits: commons.wikimedia)

आजवर आपण बड्या सिनेमाच्या तिकीटविक्रीचे मोठमोठे रेकॉर्डस झाल्याचे ऐकले असेल पण पुण्यात अलीकडे बसच्या तिकिटाच्या विक्रीने एक नवीन विक्रम केल्याचे समजत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ विभागाच्या बसचे (PMPML) कंडक्टर कुंदन काळे (Kundan Kale) यांनी अवघ्या आठ तासांच्या शिफ्ट मध्ये तब्बल 1  लाख 1  हजार 402 रुपयांची तिकिट विक्री करून आपल्या नावे एक नवा विक्रम नोंदवला आहे. यानंतर पिंपरी चिंचवड (Pimpri- Chinchvad)  महापालिकेचे महापौर राहुल जाधव (Rahul Jadhav) यांच्या हस्ते काळे यांचा सन्मान करण्यात आला.

गुरुवारी 15 ऑगस्टच्या दिवशी रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिन असा योग जुळून आल्याने पुण्यात बसप्रवाशांची तुफान गर्दी होती. यामध्येच काळे यांनी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होणाऱ्या शिफ्टमध्ये 1 लाख 1  हजार 402 रुपयांची तिकिटे विकली व ही सर्व रक्कम लगेचच संबंधित पीएमपीएल अधिकाऱ्याकडे सुपूर्त केली. तर अन्य सर्व बसच्या कर्मचाऱ्यांनी दिवसाअखेरीस 15 लाख रुपयांची रकम एकत्रित जमा केली. (पुणे: विद्यार्थ्यांना Free Bus Passes योजना, PMC उचलणार 21 कोटीचा खर्च)

पुणे मिररच्या वृत्तानुसार, कुंदन काळे हे भोसरी डेपोमध्ये मागील 11 वर्षांपासून कार्यरत आहेत. याठिकाणी ते आपल्या विशेष कौशल्यासाठी ओळखले जातात, आजवर त्यांनी एकाही प्रवाशाला कितीही गर्दी असली तरी तिकीट विरहित प्रवास करू दिलेला नाही. त्यामुळे याआधी त्यांच्या नावावर एका दिवसात 50 हजार, 75 हजार तिकीट भाड्याच्या रूपातील रक्कम जमा करण्याचा रेकॉर्ड होता, यावेळेस मात्र त्यांनी स्वतःलाच मागे टाकत हा नवा विक्रम केला आहे. एवढी मोठी रक्कम हाताळताना त्यांच्या प्रामणिकतेचे सुद्धा तितकेच कौतुक केले जाते.

या संदर्भात कुंदन काळे यांनी, आपल्या कामात एकनिष्ठता असल्यास असा परिणाम साधणे सहज शक्य होत असल्याचे सांगितलें. 15 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा त्यांनी सकाळी 5.30 वाजल्यापासूनच कामाला सुरुवात केली होती. बसमध्ये गर्दी असल्याने अनेकदा कंडक्टर प्रवाशा पर्यंत पोहचतच नाही, असे वारंवार झाल्यास विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना सूट मिळते, हा प्रकार थांवण्यासाठी बस पकडण्याच्या आधीच प्रवाशांचे तिकीट फाडत असल्याचे काळे यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे बस सेवेच्या प्रगतीसाठी भरपूर निधी खर्च करण्यात येत असल्याची माहिती राहुल जाधव यांनी दिली, हा निधी वसूल करण्यासाठी बसचे कर्मचारी मेहनत करत आहेत आणि त्यात असा विक्रम हा नक्कीच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे सुद्धा जाधव म्हणाले.