कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी देखील शैक्षणिक वर्षाची सुरूवात ही ऑनलाईन माध्यमातून झाली आहे. पुणे महापालिकेच्या शाळांनी याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता चौथी ते आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदीचा प्रस्ताव घेतला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने काल (15 जून ) मंजुरी दिली आहे. पुणे महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी इयत्ता चौथी ते आठवीमध्ये सुमारे 38 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आता पालिकेने त्यांना टॅब पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी इंटरनेट सुविधेसह टॅब पुरवले जाणार आहेत. मागीलवर्षी गणवेश, दप्तर, रेनकोट, बूट, स्वेटरसाठी 'डीबीटी'मार्फत विद्यार्थ्यांना हस्तांतरित केली जाणारी सुमारे 17 कोटी रुपयांची रक्कम पुणे महापालिकेकडे शिल्लक आहे. त्यातूनच 'टॅब'साठी तरतूद करता येईल. अशी माहिती नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रस्तावात दिली आहे. Online Education Tips for Students: ऑनलाईन शिक्षण घेणे सोपे करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स.
महाराष्ट्रात अद्याप कोरोनाचे संकट पूर्णपणे शमलेले नाही. त्यामुळे आगामी तिसर्या लाटेचा धोका पाहता आता राज्यात 14 जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली आहे. अद्याप लहान मुलांना कोरोनाची लस देण्यास परवानगी नाही. देशात कोवॅक्सिन कडून 18 वर्षाखालील मुलांसाठीच्या लसीची चाचणी सुरू आहे.