PMC Election 2022: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर; पाहा संपूर्ण दौऱ्याचे नियोजन
MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: ANI)

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (PMC Election 2022) पार्श्वभूमीवर अनेक राजीकय पक्षांकडून रणनीती ठरविण्याचे काम सुरु आहे. भाजप (BJP), शिवसेनेसह (Shiv Sena) अन्य पक्षांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (MNS) जोमाने कामाला लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मैदानात उतरले आहेत. तसेच राज ठाकरे येत्या 19 ते 21 जुलै असे तीन दिवस पुणे दौरा करणार आहेत. या दौर्‍यात राज ठाकरे आजीमाजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यासंदर्भात मनसे नेते बाबू वागसकर यांनी माहिती दिली आहे.

बाबू वागसकर यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक आणि राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यावर भाष्य केले आहे. राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर येत आहेत. तसेच राज संवाद उपक्रमा अंतर्गत सोमवारी (19 जुलै) सकाळी दहा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघाची सेनापती बापट रोडवरील, इंद्रप्रस्थ कार्यालय येथे बैठक होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच दिवशी दुपारी एक ते चार या वेळेत कोथरूड आणि खडकवासला माणिक बाग पेट्रोल पंपा समोरील, परिणय मंगल कार्यालयात बैठक होणार आहे. त्यानंतर मंगळावारी (20 जुलै) सकाळी दहा ते एक दरम्यान वेळेत हडपसर आणि कॅन्टोन्मेंट विभागाची कोंढवा खुर्द येथील लोणकर लान्स येथे बैठक होणार आहे.

त्यानंतर मंगळवारी दुपारी एक ते चारच्या दरम्यान कसबा आणि पर्वती विभागाची बिबवेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक होणार आहे. तर दौऱ्याच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच बुधवारी करोना काळात ज्या संस्थांनी चांगले काम केले आहे, राज ठाकरे संवाद साधणार आहेत, असेही बाबू वागसकर यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Sharad Pawar Meet PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्टीकरण, जयंत पाटील, नवाब मलिक यांनी दिली माहिती

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मनसेशी युती करण्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले होते. मनसे परप्रांतियांच्या बद्दलची भूमिका बदलत नाही, तो पर्यंत हे शक्य नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या जिवावर सत्ता येणार नाही. जर योग आला तर, त्यांना नक्की भेटू. तसेच राज ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, असेही पाटील यांनी म्हटले आहे.