शिवसेनेने पुणे महापालिका निवडणूक 2021 (PMC Election 2021) बाबत रणशिंग फुंकले आहे. पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना 80 जागा लढववेल असे शिवसेना ( Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. शिवसेना ही महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढली किंवा स्वबळावर लढली तरी 80 जागांवरच लढेल. शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी रणनिती आखली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा उंचावत आहे. त्यामुळे त्याचाही शिवसेनेला फायदा होणार आहे. यापुढे पुणे महापालिकेत शिवसेना नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, अशा विश्वासही संजय राऊत यांनी या वेळी व्यक्त केला. ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते.
पुणे महापालिकेत शिवसेना सत्तेत असेल किंवा किंगमेकरच्या भूमिकेत असेल. या दोन्हीपैकीच एका भूमिकेतच शिवसेने आपल्याला दिसेल असे संजय राऊत म्हणाले. खेड तालूक्यात निर्माण झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या संघर्षावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. ज्या ज्या ठिकाणी शिवसेना अडचणीत असेल अशा ठिकाणी आम्ही उभा राहू, असे संजय राऊत म्हणाले. खेडमध्ये जे झाले त्याचा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर विचार व्हावा. आमची आपेक्षा आहे की, अजित दादा हे या प्रकरणात लक्ष घालून काही मार्ग काढतील, अशी अपेक्षा असल्याचे राऊत यांनी सांगितले. (हेही वाचा, BMC Elections 2022: राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महानगरपालिका निवडणूका घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे निर्देश; Mayor Kishori Pednekar यांची माहिती)
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेवरही संजय राऊत यांनी भाष्य केले. संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नव्हेत. आजकाल शरद पवार यांच्यावर टीका करणे ही एक फॅशन झाली आहे. पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली जायची आज शरद पवार यांच्यावर होते आहे, असे राऊत म्हणाले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता चंद्रकात पाटील हे भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांनी टीका करावी परंतू कोणावर व्यक्तिगत पातळीवर बोलताना आपण काय बोलतो याचे भान राजकीय नेता म्हणून ठेवायला हवे असे राऊत म्हणाले.