Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

Eknath Shinde faction: मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकासआघाडी (MVA) सरकारला धक्का देत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षा बंड केले. परिणामी महावकासाघाडी सरकार गडगडले. दरम्यान, शिंदे यांनी भाजपसोबत जात नव्याने सरकार स्थापन केले. आता याच शिंदे यांना ताकद देण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला केंद्रात मंत्रिपदं देऊन अधिक भक्कम केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप प्रणीत एनडीए सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (PM Narendra Modi Cabinet Expansion) लवकरच होणार आहे. या विस्तारात शिंदे गटातील दोन खासदारांना मंत्रीपद मिळू शकते. या खासदारांची नावेही चर्चेत आली आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आतापर्यंत केवळ एकदाच विस्तार झाला आहे. आता सरकारचा कार्यकाळ संपून लोकसभा निवडणुका लागायला काहीच महिन्यांचा अवधी आहे. तत्पूर्वी डॅमेज कंट्रोल करुन प्रतिमा उंचावण्याचाही केंद्राचा प्रयत्न आहे. काही असले तरी शिंदे गटातील दोघा-तिघांना मात्र मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. दरम्यान, अशीही चर्चा आहे की, नरेंद्र मोदी हे धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांना मंत्रिपद देताना महाराष्ट्रातील भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची विकेट घेतली जाऊ शकते. यात नारायण राणे आणि भारती पवार यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र निश्चित? एकनाथ शिंदे यांच्या मोदी सरकारमध्ये दोन मंत्रिपदे?)

दरम्यान, शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे आणि गजानन किर्तीकर यांची नावे आघाडीवर आहेत. या नावांपैकी दोन नावांना पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हिरवा कंदील दाखवू शकतात. मात्र शिंदे यांनी केंद्राकडे तीन मंत्रिपदे मागितली आहेत. त्यानुसार दोन कॅबीनेट आणि एक राज्यमंत्रीपद अशी वाटणी होऊ शकते. अर्थात भाजप अथवा शिंदे गटाकडून याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. मात्र, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत याबाब चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, केंद्र सरकारचे आणि खास करुन भाजप नेतृत्वाचे बिहारकडेही लक्ष आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपला धक्का देत आरजेडी सोबत सत्ता स्थापन केली. दुसऱ्या बाजूला यूपीएतील घटक पक्ष आणि मित्रपक्षांची एक बैठक पाटणा येथे नुकतीच पार पडली. या बैठकीसाठी नितीशकुमार आघाडीवर होते. त्यामुळे केंद्र सरकार विरोधात सुरु असलेली विरोधकांची एकजूट रोखायची तर नितीशकुमार यांना पाटण्यातचरोखायला हवे. या विचाराने नरेंद्र मोदी यांचे हनुमान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिराग पासवान यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपला अनुकूल काम केले होते. त्यांच्या तत्कालीन लोकजनशक्ती पक्षाने नितीश कुमार यांच्या जद (यु) पक्षाविरोधातच उमेदवार उभे केले होते. त्याचे बक्षीस चिराग पासवान यांना मिळू शकते.