Plasma Donation | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

राज्यात कोरोना व्हायरस संकटामुळे (Coronavirus Pandemic) भीषण परिस्थितीत निर्माण झाली आहे. त्यात आरोग्य सुविधा, लस, औषधं यांचा अपुरा पुरवठा यामुळे परिस्थितीत बिकट होत आहे. यातच प्लाझ्मा दानाबद्दलही (Plasma Donation) नागरिकांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणा, सरकार यांच्याकडून वारंवार प्लाझ्मा दानाबद्दल जागरुक करण्यात येते. आता मात्र कोरोनाबाधित रुग्णांना स्वत:हून पुढे येत प्लाझ्मा दान करायला हवे. यासाठी पुण्यातील सामाजिक संस्था वंदे मातरम संघटनेने प्लाझ्मा प्रीमियर लीगचे (Plasma Premier League) आयोजन केले आहे. 14 एप्रिल ते 15 मे दरम्यान ही स्पर्धा होणार असून यात राज्यात कोणतंही रजिस्टर्ड गणेश मंडळ, सामाजिक संघटना सहभागी होऊ शकतात. स्पर्धा काळात जी संस्था, संघटना कोरोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहित करेल, ते या स्पर्धेत विजयी होतील. (प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल? जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीबद्दल सविस्तर)

मागील वर्षी सुरु झालेल्या कोरोना व्हायरस संकटापासूनच पुण्यातील वंदे मातरम संघटना विविध सामाजिक कार्य करत आहे. गरजूंना अन्नवाटप, कोरोना रुग्णांची मदत, रक्तदान, प्लाझ्मा दान अशा कामांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. मात्र सध्याची राज्यातील परिस्थिती आणइ प्लाझ्मादानाची आवश्यकता लक्षात घेऊन एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत, यासाठी संघटनेने या उपक्रमाची सुरुवात केली.

इंडियन प्रिमीयर लीग किंवा आयपीएल अत्यंत प्रसिद्ध असून त्याचप्रमाणे प्लाझ्मा प्रिमीयर लीग पीपीएल ची सुरुवात करण्यात आली आहे. प्लाझ्मा दानासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा यामागील मूळ उद्देश आहे, असे वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ यांनी सांगितले. या स्पर्धेत अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढवा यासाठी बक्षिसंही ठेवण्यात आले आहे. पहिले बक्षीस 50,000 रुपये, दुसरे 30,000 आणि तिसरे 20,000 रुपये अशी बक्षीसाची रक्कम असेल. बक्षीस मिळवण्यासाठी त्यांना कमीत कमी 100 प्लाझा डोनेशन्सचे पुरावे सादर करावे लागतील.

राज्यातील सध्याच्या परिस्थितीत रेमडेसिवीर किंवा हॉस्पिटल्स बेड्स उपलब्ध करुन देण्याबाबत आम्ही फार काही करु शकत नाही. परंतु, प्लाझ्मा दानासाठी लोकांना नक्कीच प्रोत्साहित करु शकतो. त्यामुळे आमच्या उपक्रमाची माहिती आम्ही सोशल मीडिया माध्यमातून  देत आहोत. त्यानंतर आम्हाला नाशिक, सातारा, आळंदी, पिंपरी-चिंचवड येथून चांगला प्रतिसाद मिळाला, असे वैभव वाघ यांनी सांगितले.