Kishori Pednekar: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
Kishori Pednekar (Photo Credit: ANI)

भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया (Kirit Somaiya) हे गेले दोन-तीन दिवस सलग मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करताना दिसत आहेत. येत्या 28 नोव्हेंबरला ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्त ठाकरे सरकारच्या कार्यकाळात झालेल्या आणखी तीन घोटाळ्यांबाबत कायदेशीर कारवाई सुरु करणार आहे. त्यासाठी एक याचिका लोकायुक्तांकडे आणि दोन याचिका मुंबई हायकोर्टात दाखल होणार, असे मुंबई आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. किरीट सोमय्या म्हटले होते. यातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी स्वत:च्या पदाचा गैरवापरकरून कुटुंबीयांचा व आपल्या कंपनीचा फायदा करून घेतल्याचा आरोप करणारी जनहित याचिका डॉ. किरीट सोमैया यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

गरीब झोपडपट्टीवासियांसाठी बांधण्यात आलेले अधिक गाळे पेडणेकर यांनी बेकायदेशीररित्या अपारदर्शक पद्धतीने स्वत:च्या परिवाराच्या, कंपनीच्या ताब्यात ठेवल्यासंबंधीचे पुरावे डॉ. किरीट सोमय्या यांनी याचिकेत दिले आहेत. या जनहित याचिकेत किरीट सोमय्या यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई महापालिका, राज्य सरकार व अन्य 19 लोकांना प्रतिवादी केले आहे. दिव्या शाह असोसिएट्स सॉलिसीट्सच्या तर्फे ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Sanjay Raut on Kirit Somaiya: 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर'; अन्वय नाईक यांच्यावरुन ठाकरे कुटुंबियांवर किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

डॉ. किरीट सोमय्या यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. “किरीट सोमय्या हे शिखंडी आहेत. साडी नेसायचे बाकी आहेत, ते पण आम्ही करु. मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत, मी महापौर म्हणून चांगले काम करत आहे, मंत्री महोदय काम करत आहेत, त्यांना डिस्टर्ब करायचे. मी अख्ख्या भाजपला धरत नाही, किरीट सोमय्या हे शिखंडीचा रोल करत आहेत, ते त्याच लायकीचे आहेत” असेही किशोरी पडणेकर म्हणाल्या आहेत.