कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा प्रतिकात्मक पुतळा काल संध्याकाळी जाळण्यात आला. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात (Maharashtra-Karnataka Border) अधिकच वाद निर्माण झाला आहे. कर्नाटक राज्यात राहत असलेल्या मराठी लोकांवर अत्याचार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांसह राजकारणदेखील पेटले आहे. यातच शिवसेना खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरंविद सावंत (Arvind Sawant) यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. महाराष्ट्रात देखील कन्नड लोक राहतात हे कर्नाटक सरकारने लक्षात ठेवावे, असा सूचक इशारा अरविंद सावंत यांनी कर्नाटकच्या सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमा वाद मागील कित्येक वर्षांपासून खितपड पडला आहे. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा शनिवारी संध्याकाळी कर्नाटक येथे जाळण्यात आला. यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादाने आणखी पेट घेतला आहे. तसेच यावर अरविंद सावंत यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "कन्नड वेदिका संघटना आहे की वेडीका संघटना….ती वेड्यांचीच संघटना आहे. महाराष्ट्राला नेहमी आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागला आहे. बेळगाव, कारवार निपाणीमधील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत आहे. मराठी माणसावर पराकोटीचा अन्याय कर्नाटक सरकारने केला आहे. पण महाराष्ट्राने प्रतिक्रिया कधीही दिली नाही", असे अरविंद सावंत टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केल्यानंतर युवासेनेचे जिल्हा अधिकारी हर्षल सुर्वे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे प्रतीकात्मक पुतळ्यावर काळी शाई फेकत जोडे मारे अंदोलन केले. तसेच आज रविवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेकडून बस स्थानकापासून निषेध रॅली काढण्यात येणार आहे. हे देखील वाचा- 'वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही' म्हणत अमृता फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र
बेळगावमध्ये भाषिक मुद्यावरुन वातावरण तापल्यामुळे खबरदारी म्हणून कोल्हापूरहून कर्नाटकच्या दिशेने ये- जा करणारी बस सेवा रद्द करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर ते कर्नाटक आणि कर्नाटक ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. सीमा प्रश्नाच्या वादाचा फटका बस सेवेला बसू नये, यासाठी प्रशासनाकडून बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे