Parbhani Shiv Sena MP Bandu Jadhav Resign: परभणीचे शिवसेना खासदार बंडू जाधव यांचा राजीनामा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवले पत्र
Shivsena MP Bandu Jadhav | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना खासदार बंडू जाधव (Parbhani Shiv Sena MP Bandu Jadhav ) यांनी राजीनामा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्याकडे खा. बंडू जाधव यांनी आपले राजीनामापत्र कालच (मंगळवार, 26 ऑगस्ट) सूपूर्त केले. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गळचेपी होत असलेल्याचे कारण देत बंडू जाधव यांनी राजीनामा दिल्याचे समजते. राज्यात सत्तेत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जोरदार संघर्ष सुरु असल्याचे या घटनेतून पुढे आल्याचे दिसत आहे. या आधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पारनेर पालिकेलीतल शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले होते. मात्र त्याचे जोरदार पडसाद उमटल्यानंतर हे नगरसेवक राष्ट्रवादीने शिवसेनेत पाठवले होते.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळ नियुक्तीत शिवसेना पक्षाच्या शिवसैनिकाला संधी मिळत नसल्याने बंडू जाधव नाराज आहेत. त्यातूनच त्यांनी राजिनामा दिल्याचे समजते. मी बाळासाहेबांचा शिवसैंनिक आहे. तळागाळातील कार्यकर्त्याला पदांवर जाण्याची संधी मिळत नसेल तर मला खासदार म्हणून पदावर राहण्याचा काय अधिकार? असा सवालही बंडू जाधव यांनी पत्रात उपस्थित केला आहे.

बंडू जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर राबवलेले राजकारण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. परभणी येथील जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले. याकडे लक्ष वेधताने बंडू जाधव यांनी म्हटले आहे की, जिंतूरमध्ये राष्ट्रवदी काँग्रेस पक्षाचा आमदारही नाही. तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशासकीय मंडळ येथे नियुक्त करण्यात आले. या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यानंतर आताही पुन्हा जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचंच प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं. हा प्रकार दुसऱ्यांदा घडत आहे. (हेही वाचा, Former MLA Vijayraj Shinde: शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांचा भाजपात प्रवेश)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थानिक पातळीवर करत असलेल्या गळचेपीमुळे पक्षाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तळागाळातील शिवसैनिकाला जर पदावर जाण्याची संधी मी देऊ शकत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची? आज इतर पक्षातील अनेक नेते कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करायला तयार आहेत. मात्र, माझ्या पक्षातीलच शिवसैनिकांना मी जर पदांवर स्थान देऊ शकत नसेल. त्यांना न्याय देऊ शकत नसेल. तर इतर पक्षांतून आलेल्यांना कसा न्याय देणार. असे असेल तर खासदार पदावर राहण्याचा मला अधिकार नाही, असेही बंडू जाधव यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या इतर कोणत्याही मंत्री अथवा नेत्याने बंडू जाधव यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले नाही. दुसऱ्या बाजूला शिवसेना नेते बंडू जाधव यांची समजूत काडत असल्याचे समजते. मात्र, या निमित्ताने परभणीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणत्याह प्रकारचा समन्वय नसल्याचे पुढे आले आहे.