प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

कोकणातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला प्रचंड विरोध झाल्याने शेवटी हा प्रकल्प रोह्याला हलवण्यात आला. आता अशीच एक बाहेरची कंपनी कोकणात कोट्यवधींची गुंतवणूक करणार आहे, ज्याद्वारे तब्बल दहा हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या धरमतर येथे चिनी नाईन ड्रॅगन (Nine Dragons) चा पेपर उत्पादनाचा प्रकल्प उभा राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation) आणि चीनमधील नाईन ड्रॅगन्स पेपर्स यांमध्ये याबाबतचा करार झाला आहे, त्यानुसार ही कंपनी साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणर आहे. येत्या पाच वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल.

या प्रकल्पाद्वारे दोन्ही देशातील औद्योगिक क्षेत्रात फार मोठी प्रगती होणार आहे. शनिवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन आणि नाइन ड्रॅगन्स पेपर्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिंग छोंग ड्यू यांनी या करारारवर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतिश गवई ही मंडळी उपस्थित होती. (हेही वाचा: नाणारचा प्रकल्प महाराष्ट्रातच होणार! सिडकोच्या माध्यमांमधून 50 हजार एकर जमीन अधिग्रहित)

येत्या दोन ते तीन वर्षांत या कराराची सर्व कागदपत्रे पूर्ण होतील, त्यानंतर प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. यासाठी राज्य सरकार सर्व मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्रकल्पाद्वारे सुमारे तीन हजार प्रत्यक्ष; तर चारपट अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी भूसंपादन होणार आहे, मात्र यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याचही खबरदारी घेतली जाणार आहे.