नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा फार मोठा पराभव झाला. त्यांचे भाऊ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय मुंडे यांनी त्यांना मात दिली. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पंकजा मुंडे यांचा मोठा वावर होता. मात्र या पराभवानंतर त्या माध्यमांसमोर फार कमी वेळा आल्या. आता येत्या 12 डिसेंबर रोजी पंकज मुंडे यांनी एका महासभेचे आयोजन केले आहे. या सभेमध्ये त्या जनतेशी संवाद साधणार आहेत. एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.
पंकजा मुंडे फेसबुक पोस्ट -
आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, 'विधानसभेतील पराभवाची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. त्यानंतरही पक्षाप्रती असलेली कर्तव्ये मी पार पाडली आहेत. पाच वर्षं सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली ही फार मोठी गोष्ट आहे. पराभवानंतरही अनेकांनी मला भेटण्याची, पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आज सर्व गोष्टींचा विचार करून आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आता तुम्हाला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी मी येत आहे. 12 डिसेंबरला आपण भेटू'
(हेही वाचा: निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना मिळाला आणखी एक दणका; पीएफ कार्यालयाने दिले आहेत 'हे' आदेश)
12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस. त्या दिवशी पंकजा मुंडे जनतेशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथगडावर (Gopinath Gad) ही सभा पार पडणार आहे. मात्र या सभेत त्या काय बोलतील, काय निर्णय घेतील याची उत्सुकता सर्वाना लागलेली आहे. या पोस्टच्या शेवटी पंकजा मुंडे यांनी 'मावळे येतील हे नक्की!' असे शब्द लिहिले आहेत. आतापर्यंत भगवानगडासंदर्भात मावळे असा उल्लेख कधी झाला नव्हता. मावळे हा शब्द साधारण शिवसेनेसंदर्भात वापरला जातो, त्यामुळे पंकजा मुंडे यांचा रोख नक्की कोणत्या दिशेला आहे याचा अंदाज 12 डिसेंबर रोजी येईल.