Panel To Probe Pooja Khedkar's Candidature: केंद्र सरकारने आयएएस अधिकारी पूजा खेडकरशी (Pooja Khedkar) संबंधित वादांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकरने नागरी सेवक म्हणून तिच्या अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल निर्माण झालेल्या वादानंतर ही चौकशी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. पूजा खेडकरच्या उमेदवारीबाबतचे दावे आणि इतर तपशिलांची पडताळणी करण्यासाठी अतिरिक्त सचिव स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही एक सदस्यीय समिती काम करेल. ही समिती 2 आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे.
याबाबत कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने माहिती दिली आहे. खेडकरचे गैरवर्तन आणि शिक्षणाशी संबंधित आरोपांच्या संदर्भात ही चौकशी करण्यात येत आहे. याबाबत माध्यमांनी जेव्हा तिला प्रश्न विचारले, तेव्हा तिने काहीही बोलणे टाळले. ‘सध्या मला माध्यमांशी संवाद साधण्याचा अधिकार नाही. मला जे काही सांगायचे असेल ते मी समितीसमोर मांडेन’, असे ती म्हणाली. खेडकरवर अपंगत्व आणि ओबीसी कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. पूजा खेडकर ही महाराष्ट्र केडर 2023 बॅचची आयएएस अधिकारी आहे. तिने संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 841 वा क्रमांक पटकावला होता. (हेही वाचा: IAS Officer Puja Khedkar यांच्या आईचा अरेरावीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; पुण्यातील मुळशी येथे जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून केली दमदाटी)
पहा व्हिडिओ-
#WATCH | Washim, Maharashtra: On Centre sets up panel to probe her candidature, IAS probationer Pooja Khedkar says, "I am not authorised to say anything to the media. I will give my submissions before the committee. I will follow the procedure." pic.twitter.com/RJfuS9BXUV
— ANI (@ANI) July 12, 2024
बदलीनंतर खेडकरने गुरुवारी विदर्भातील वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक जिल्हा दंडाधिकारी म्हणून नवीन पदभार स्वीकारला. प्रशिक्षणापूर्वीच पूजा खेडकरची पुण्यातून बदली झाली आहे. लोकांना धमकावल्याचा, तसेच आपल्या वैयक्तिक ऑडी कारवर लाल दिवा लावल्याचा आरोप तिच्यावर आहे. यासह भारतीय प्रशासकीय सेवेत सामील होण्यासाठी शारीरिक अपंगत्व श्रेणी आणि इतर मागासवर्गीय (OBC) कोट्यातील लाभांचा गैरवापर केल्याचा आरोपही तिच्यावर आहे. अशा अनुचित वर्तनामुळे सोमवारी तिची पुण्याहून वाशीम येथे बदली करण्यात आली.
दावा केला जात आहे की, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना उपलब्ध नसलेल्या सुविधांची मागणी तिने केली होती. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अहवालात, खेडकरने अनेक वेळा स्वतंत्र खोली, कार, निवासी क्वार्टर आणि शिपाई यासह विशेष सुविधांची मागणी केल्याचे समोर आले आहे. तसेच तिच्यावर पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नेम प्लेट काढल्याचा आरोपही आहे. या सर्व वादामुळे पूजा खेडकरची पुण्याहून मध्य महाराष्ट्रातील वाशीम येथे बदली झाली.