Maharashtra: राष्ट्रीय पोलीओ लसीकरणाला (National Polio Vaccination Campaign) सर्वत्र 31 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार विविध ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शून्य ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना पोलीओचे डोस दिले जात आहेत. परंतु काही ठिकाणी पोलीओ डोसच्या नावाखाली चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यवतमाळ नंतर आता पंढरपूर येथील पोलीओ लसीकरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर पंढरपूर येथे लहान बाळाला पोलिओचा डोस देताना डोसच्या बाटीला असणाऱ्या ड्रॉपरचे टोपणासह ते त्याच्या तोंडात टाकले जात होते. अशातच मुलाच्या पोटात प्लास्टिक गेल्याची बाब समोर आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर पोलिओची डोस देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणा मुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण आता या लहान मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली गेली आहे.(धक्कादायक! पोलिओची लस दिल्यानंतर सात महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू; पालघर जिल्ह्यातील घटना)
दरम्यान, याआधी यवतमाळ येथील कापसी कोपरी मधील पोलिओ लसीकरणाच्या वेळी 12 लहान मुलांना त्याचे डोस देण्याऐवजी चक्क सॅनिटायझर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामधील 1 ते 5 वयोगटातील सर्व मुले असून त्यांच्या पोटात पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायझर गेल्याने उलट्या झाल्या. त्यामुळे सर्व मुलांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (धक्कादायक : पोलिओच्या लसीमध्ये आढळला ‘टाइप-2’ विषाणू; महाराष्ट्रात 15 लाख मुलांना दिली गेली सदोष लस)
या घडलेल्या प्रकारानंतर पालकवर्गांकडून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. तसेच लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. दरम्यान, यवतमाळ जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.