Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे एकाच कुटुंबातील तीघांचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात ही घटना घडली. मृतांमध्ये राजू बापू पाटील (Raju Bapu Patil) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चुलते आणि धाकटे बंधू महेश पाटील यांचा समावेश आहे. राजू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते होते. गेल्या काही काळापासून पंढरपूर तालुक्यात कोरोना व्हायरस संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. त्याचाच फटका पाटील कुटुंबीयांना बसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

राजू बापू पाटील यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह येताच त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच आज (13 ऑगस्ट) पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , भाऊ , भावजय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे सोलापूर जिल्ह्यातील नजीकचे सहकारी म्हणून राजू पाटील यांना ओळखले जात होते. (हेही वाचा, Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स)

महत्त्वाचे म्हणजे राजू पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था अशी रयत शिक्षण संस्थेची ख्याती आहे. या संस्थेच्या सदस्यपदासाठी राजू पाटील यांची शिफारस स्वत: शरद पवार यांनी केली होती. राजू पाटील यांचे वडील दिवंगत यशवंत भाऊ पाटील हेसुद्ध रयत शिक्षण संस्थेचे सदस्य होते.

राजू पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. त्यांनी जिल्हा परिषदेचे सभापती म्हणूनही काम पाहिले होते. अलिकडे त्यांनी गुळ उत्पादनाचा कारखानाही काढला होता. ज्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला होता.