
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येमुळे पंढरपूरची माघी यात्रा (Pandharpur Maghi Yatra) भाविकांशिवायच साजरी करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावांमध्ये 24 तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 22 फेब्रुवारी रात्री 12 पासून 23 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. त्यामुळे यात्रा काळात कोणत्याही भाविकाला किंवा दिंडीला पंढरपूरमध्ये प्रवेश मिळणार नाही.
मंदिर समितीने यापूर्वीच दशमी व एकादशी म्हणजे 22 आणि 23 फेब्रुवारीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात देवाचे सर्व नित्योपचार व एकादशीची महापूजा कोविड-19 चे नियम पाळून करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. माघी यात्रा काळात वासकर महाराज यांच्या भजन परंपरेला केवळ 6 लोकांना तर औसेकर महाराज यांच्या चाकरी भजनाला 12 लोकांना आणि पुंडलिक रायच्या काल्याला 26 वारकरी व मानाकाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळेस सर्वांना कोविड-19 नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसंच यावेळी उपस्थित राहणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
दरम्यान, यात्रेसाठी आलेल्या भाविक आणि वारकऱ्यांना परत पाठवण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाकडे देण्यात आली आहे, त्यामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांना परतीची वाट धरावी लागणार आहे. मागील वर्षी कोविड-19 संकटामुळे आषाढी, कार्तिकी यात्रा आणि सर्व सोहळे रद्द करण्यात आले होते. नवीन वर्षात लसीकरण सुरु झाल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र रुग्णसंख्येत सातत्याने होणारी वाढ धोक्याचा इशारा देत आहे. त्यामुळेच वारकरी संप्रदायाची नववर्षातील पहिली यात्राही रद्द करण्यात आली आहे.