महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात 21 वर्षीय गर्भवती आदिवासी महिलेचा मृत्यू झाला आहे. सोनाली वाघट असे या महिलेचे नाव असून, ती नऊ महिन्यांची गरोदर होती. ही महिला अशा अवस्थेमध्ये सात किलोमीटर चालत प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत (PHC) गेली आणि नंतर घरी परतली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण सनस्ट्रोक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, वैद्यकीय निष्काळजीपणाला ती बळी पडल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पालघर जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. संजय बोदाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी डहाणू तालुक्यातील ओसविरा गावातील गर्भधारणेच्या नवव्या महिन्यात असलेल्या सोनाली वाघटने रखरखत्या उन्हात 3.5 किलोमीटर चालत महामार्ग गाठला. तिथून ती ऑटो रिक्षाने तवा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली. आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर, महिलेवर उपचार करून तिला घरी सोडण्यात आले. जाताना तिला 27 मे रोजी परत येण्याचा सल्ला देण्यात आला.
डॉक्टर बोदाडे यांच्या म्हणण्यानुसार, अस्वस्थ वाटत असतानाही अशा अवस्थेमध्ये ती कडाक्याच्या उन्हात पुन्हा 3.5 किमी चालत घरी गेली. घरी पोहोचल्यावर तिला खूप ताप आला. त्यानंतर तिला कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिला पॅरासिटामोलची गोळी देण्यात आली, परंतु तिची प्रकृती सुधारत नसल्यामुळे तिला सुमारे 15 किलोमीटर दूर असलेल्या तलासरी येथील वेदांत रुग्णालय रेफर केले गेले. वेदांत हॉस्पिटलमध्ये जात असताना, महिला आणि तिच्या न जन्मलेल्या मुलाचा मृत्यू झाला. (हेही वाचा: माणुसकीला काळीमा! रुग्णवाहिकेचे भाडे द्यायला नव्हते पैसे; वडिलांनी मुलाचा मृतदेह बॅगमध्ये घेऊन केला 200 किलोमीटर प्रवास)
डॉ. बोदाडे यांनी महिलेच्या मृत्यूबाबत वैद्यकीय निष्काळजीपणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, महिलेचे गाव दूरवर वसलेले असल्याने तिथे वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे सकाळी साडेदहा वाजता उन्ह असताना ती पायी चालत तवा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली आणि दुपारी तीन वाजता तशाच कडक उन्हात घरी परतली. यामुळेच तिला ताप येऊन तिचा व तिच्या बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन डॉ.बोदाडे यांनी दिले आहे.