महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून ऑक्सिजनचा तुटवडाही रुग्णालयात भासत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक रुग्णालयांत आगीच्या घटना ऐकायला मिळाल्या. तसेच नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकर गळती घटनेने तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. यावर खबरदारीचा उपाय म्हणून आता राज्यातील सर्व रुग्णालयातील फायर आणि ऑक्सिजनचे ऑडिट (Fire and Oxygen Audit) होणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासंबंधीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
नाशिक रुग्णालय दुर्घटना आणि त्यानंतर आज घडलेली विरार रुग्णालयातील दुर्घटनेनंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ही माहिती दिली आहे.हेदेखील वाचा- Virar Hospital Fire Update: विरार च्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आग प्रकरणी कर्मचारी, व्यवस्थापन आणि डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल
आज मुख्य सचिवांच्या झालेल्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी "रुग्णालयाला पुरविण्यात येणा-या रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन टँकर यांची वाहतूक ही पोलिसांच्या अध्यक्षतेखाली व्हावी." असे सीताराम कुंटे यांनी सांगितले. आज झालेल्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
दरम्यान आज सकाळी विरारमधील (Virar) विजय वल्लभ रुग्णालयामध्ये (Vijay Vallabh COVID Care Hospital) आग (Fire) लागली होती. या आगीत 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत केली जाणार आहे. तर, जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली जाणार आहे. तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आणि जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, वसई-विरार महापालिकेकडूनही मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.