कोरोना वायरसचा देशातील प्रादुर्भाव कमी होत असल्याने आता हळूहळू जनजीवन पूर्वीप्रमाणे स्थिर स्थावर होण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये नागरिकांना लॉकडाऊन मधून सूट मिळत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे अनेकांची खरेदीसाठी, दिवाळीसाठी बजेटची आकडेमोड सुरू झाली असेल. पण या नव्या महिन्यात काही नवे नियम आले आहेत ते तुमच्या बजेटवर परिणाम करू शकतात त्यामुळे बदललेले हे नवीन नियम देखील नक्की जाणून घ्या. यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग (LPG Gas Cylinder )पासून राज्यातील बॅंकांच्या वेळेमध्ये होणारे बदल आहेत.
LPG गॅस सिलेंडरसाठी ओटीपी
1 नोव्हेंबर पासून गॅस बूक केल्यानंतर तो स्वीकारण्यासाठी आता तो घरपोच घेऊन येणार्या व्यक्तीला तुम्हांला ओटीपी द्यावा लागणार आहे. ओटीपी दिल्याशिवाय गॅस सिलेंडरची डिलेव्हरी दिली जाणार नाही. दरम्यान 1 नोव्हेंबरपासून होणार्या डिलेव्हरीसाठी हा नियम लागू केला जाणार आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती
दर महिन्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील इंधनाचे दर पाहून गॅस सिलेंडरच्या किंमती ठरवल्या जातात. नोव्हेंबर महिन्यासाठी अद्याप दर जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र त्यात फार बदल होण्याची शक्यता कमी आहे.
बॅंकांच्या वेळा बदलणार
महाराष्ट्रात आता बॅंकांच्या वेळा बदलणार आहेत. नव्या नियमानुसार, सकाळी 9 ते संध्याकाळी 4 अशा वेळेतच बॅंका काम करणार आहेत. हा नियम सार्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसाठी असेल.
SBI कडून सेव्हिंग अकाऊंटच्या व्याजदरात कपात
SBI कडून सेव्हिंग अकाऊंटच्या व्याजदरात कपात जाहीर करण्यात आली आहे. यामुळे एसबीआय बॅंक अकाऊंटच्या ग्राहकांना फटका आहे. 0.25% कपात जाहीर केल्याने नवा दर हा 3.25% इतका त्याचा दर असेल.
डिजिटल पेमेंट
आता 1 नोव्हेंबरपासून जर 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेसाठी व्यवहार करणार्यांना तो डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून करावा लागेल. यावर कोणतेही शुल्क नसेल.
नोव्हेंबर महिन्यात सणवार आणि त्यापाठोपाठ आता लग्नसराई सुरू होत आहे. त्यामुळे मोठे आर्थिक व्यवहार सोने खरेदी, बॅंकेमध्ये सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने यांची काढघाल होणार आहे. त्यासाठी बाहेर पडताना आता तुम्हांला बॅंकांच्या वेळा बघूनच जावं लागणार आहे. तसेच इतर व्यवहार करतानाही नव्या नियमांचं भान ठेवा म्हणजे गोंधळ टाळता येतील.