Devendra Fadnavis, Anil Deshmuh (Photo Credit: PTI/ ANI)

पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांना राजीनामा देण्यासाठी उशीरच झाला आहे. त्यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय कोणता पर्यायच नव्हता, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला आहे.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपाकडून सातत्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी मागणी केली जात होती. अखेर आज त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, हे न्यायालयाच्या निर्णयानंतर अपेक्षितच होते. महत्वाचे म्हणजे, गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्यासाठी उशीरच केला आहे. रश्मी शुक्लांचा अहवाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचा तत्काळ राजीनामा घ्यायला हवा होता, अशी आमची अपेक्षा होती. परंतु त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली आहे", असे फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Anil Deshmukh यांच्या गृहमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर कोण होऊ शकतं नवे गृहमंत्री? हसन मुश्रीफ, दिलिप वळसे पाटील यांच्यासह ही नावं चर्चेत!

ट्वीट-

दरम्यान, फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. राज्यात इतक्या भयावह घटना घडत आहेत. राज्यातील मंत्र्यांवर कधी नव्हे तेवढे आरोप लागले आहेत. परंतु, अजूनही मु्ख्यमंत्र्यांनी यावर बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे शांत राहणे, हे अस्वस्थ करणारे आहे. यासंदर्भात त्यांनी बोलायला हवे. मुख्यमंत्री बोलत का नाहीत? असा माझा सवाल आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्र्यांनी लोकांना आश्वस्त करायचे असते. त्यांनी चूक सुधारु असे सांगणे अपेक्षित,' असेही फडणवीस म्हणाले आहेत.