मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राबवलेल्या 'ऑपरेशन रीयुनाईट' (Operation Reunite) ला चांगले यश येताना दिसत आहे. पोलिसांनी 'ऑपरेशन रीयुनाईट' च्या माध्यमातून अवघ्या 45 दिवसांत 487 मुलांची सुटका केली आहे. मुंबई शहर पोलिसांनी याबाबत नुकतीच एक आकडेवारी सामायिक केली. त्या आकडेवारीनुसार, 'ऑपरेशन रीयुनाईट' या विशेष मोहिमेंतर्गत 15 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान 18 वर्षाखालील शेकडो मुलांना वाचवण्यात पोलिसांना यश आल्याचे पुढे आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, "या मोहिमेदरम्यान केवळ अपहरण किंवा हरवण्याच्या तक्रारी रेकॉर्डवर नोंदवल्या गेलेल्या मुलांचेच नाही तर ज्या मुलांच्या हरवण्याच्या तक्रारी रेकॉर्डवर आढळल्या नाहीत अशा मुलांचीही सुटका ऑपरेशन पुनर्मिलनचा भाग म्हणून करण्यात आली."
'ऑपरेशन रीयुनाईट' अंतर्गत केलेल्या कारवाईत 15 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान एकूण 230 मुले आणि 257 मुलींची सुटका करण्यात आली. या सुटका करण्यात आलेल्या मुलांपैकी 68 मुले आणि 135 मुली अशा होत्या ज्यांच्या बेपत्ता नोंदी होत्या. 154 मुले आणि 122 मुली ज्यांच्या बेपत्ता नोंदी अस्तित्वात नाहीत परंतु त्यांची सुटका करण्यात आली. या मुलांना त्यांच्या कुटुंबियांकडे पुन्हा पाठविण्यासाठी प्रयत्नही करण्यात आले. अनेकांना त्यांच्या पालकांकडे सोडण्यात आले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत, मुंबई पोलिसांनी अपहरणाच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन महिन्यांच्या आणि एका वर्षाच्या लहान मुलांचीही सुटका केली आहे. चार दिवसांपूर्वी शहरातून अपहरण झालेल्या एका वर्षाच्या मुलीची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा, Shocking! 21 दिवसांच्या मुलीच्या पोटातून बाहेर काढले 8 अविकसित भ्रूण; डॉक्टरांनाही बसला आश्चर्याचा धक्का)
"एक" वर्षाच्या मुलीचे सांताक्रूझ पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण करून नेणाऱ्या २ महिला आरोपींना गुन्हे शाखा कक्ष ९ पथकाने अटक केली. आरोपी सोलापूरला जाणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. @rpfcrsur यांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. बळीत मुलीस सुखरूप आईच्या ताब्यात दिले. pic.twitter.com/MBC9XMGNCL
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) November 3, 2022
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी स्वत: गुरुवारी सुटका करण्यात आलेल्या मुलाची तिच्या आईची भेट घडवून आणली.या मुलीचे 30 ऑक्टोबर रोजी सांताक्रूझ येथून अपहरण करण्यात आले होते. या महिलांनी तेलंगणामध्ये बालक विकण्याचा प्रयत्न केला होता. सोलापूर रेल्वे स्थानकातून बुधवारी या मुलीची सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मित्रां सोबत खेळायला जातो असे सांगून १३ वर्षीय मुलगा घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पो.उ.नि परकाळे आणि पथकाने अंधेरी परिसरात शोध घेतला असता तो सापडून आला त्या मुलास त्याच्या आईकड़े सुरक्षितपणे सोपवण्यात आले. pic.twitter.com/IgxVjcbeni
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) November 1, 2022
अशाच एका घटनेत, गेल्या आठवड्यात, दोन दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतून अपहरण करण्यात आलेल्या दोन महिन्यांच्या मुलीचा छडा लागला. या प्रकरणात पोलिसांनी एका जोडप्याला पकडले. अँटॉप हिल परिसरातून या अर्भकाची सुटका केल्यानंतर तिच्या पालकांशी संपर्क करुन बाळाला त्यांच्याकडे सूपूर्त करण्यात आले.