New Online Fraud: नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणाची ऑनलाईन फसवणूक, बँक खात्यातून पैसे गायब, सतर्क राहण्यासाठी पहा हा वीडियो
Online Fraud | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुण, तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका ट्विटर युजरने या प्रकाराचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ज्या तरुणाची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud in Mumbai) झाली आहे तो तरुण आपल्याबाबत घडलेला प्रकार कथन करताना दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार, फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव महेश असे असून तो मुंबई (Mumbai) येथील राहणारा आहे. प्राप्त माहितनुसार, फसवणूक झालेला महेश नामक तरुन इंटरनेटवर नोकरी सर्च करत होता. गुगलवर त्याने जॉब असे सर्च केले. काही वेळाने त्याच्या फोनवर एक फोन आला. त्याला फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तुम्ही नोकरीच्या शोधात आहात. आम्ही तुमच्या मोबाईलवर एक लिंक पाठवत आहोत. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही आवश्यक माहिती औपचारीक स्वरुपात भरा.

फोनवरील माहितीनुसार, तरुणाने मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक केले. तसेच लिंकवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांसह आवश्यक ती सर्व माहिती भरली. आता या तरुणाला आपल्याला नोकरीचा कॉल येईल असे वाटत होते. दरम्यान त्याच्यासोबत भलताच प्रकार घडला. तरुणाच्या बँक खात्यातून 2500 रुपये त्याच्या परस्परच काढून घेण्यात आले. तरुणाचा मोबाईल क्रमांक बँक अकाऊंटशी कनेक्ट होता. बँक खात्यावरील पैसै कमी झाल्यानंतर तरुणाच्या ध्यानात आले की त्याची फसवणूक झाली आहे. (हेही वाचा, धक्कादायक! फेसबुकवरून ओळख झालेल्या मुलीकडून तब्बल 1 कोटी 43 लाखांची फसवणूक; तरुणाची पोलिसात धाव)

केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिल्यापासून खासगी कंपन्यांच्या जोरावर देशात इंटरनेट मोठ्या प्रमाणावर आणि स्वस्त दरात उपलब्ध झाले. परंतू, त्यामुळे डिजिटल चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. अनेक प्रकारचे डिजिटल घोटाळे, ऑनलाईन फसवणूक, नागरिकांच्या खासगी जीवनाची माहिती सार्वजनिक होणे यांसारखे अनेक प्रकार पुढे येत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कायदे अधिक करावे, पोलीसांनी अधिक लक्ष घालावे व नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक असल्याची भावना डिजिटल क्षेत्राचे अभ्यासक व्यक्त करत आहेत.