धक्कादायक! फेसबुकवरून ओळख झालेल्या मुलीकडून तब्बल 1 कोटी 43 लाखांची फसवणूक; तरुणाची पोलिसात धाव
फेसबुक (संग्रहित संपादित प्रतिमा)

दक्षिण पूर्व रेल्वेच्या आद्रा विभागातील बोकारो (Bokaro) रेल्वे गुड्स साइडसाठी काम करणाऱ्या व्यक्तीची, तब्बल 1 कोटी 43 लाख सात हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ही फसवणूक फेसबुकद्वारे (Facebook) ओळख झालेल्या एका मुलीने केली आहे. ट्रान्सपोर्टर एसपी सिंह असे या व्यक्तीचे नाव असून, ते धनबाद येथील रहिवासी आहेत. यासंदर्भात ट्रान्सपोर्टरच्या फिर्यादीवरून बोकारोच्या बालीडीह पोलिसांनी शुक्रवारी आयकर कायद्यानुसार फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला. या प्रकरणात शिमला (हिमाचल प्रदेश) येथील अलिशा कश्यप या मुलीला अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सुरु असून, बोकारो पोलिस सायबर सेलची मदत घेत आहेत.

दाखल केलेल्या एफआयआरनुसार, ट्रान्सपोर्टरने सांगितले की, आरोपी अलिशा कश्यप याच्याशी एप्रिल 2018 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून त्याची ओळख झाली. 22 सप्टेंबर 2018 रोजी ही मुलगी मुलगी बोकारो येथे आली होती. इथे ती एका हॉटेलमध्ये थांबली होती. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी अलिशा पुन्हा शिमल्याला परत गेली. त्यानंतर या खोट्या मैत्रीच्या आडून तिने आपल्या आर्थिक परिस्थितीचे रडगाणे ऐकवून पैशाची मागणी केली. त्यानंतर अनेकवेळा या ट्रान्सपोर्टरने एकूण एक कोटी 43 लाख या मुलीच्या बँक खात्यामध्ये पाठवले. (हेही वाचा: फेसबुक वापरताय? सावधान! विकले जात आहेत तुमचे 'प्रायव्हेट मेसेज')

या दोघांमध्ये हे पैसे परत करण्याचा करारही झाला. या पैशांबदल्यात अलिशाने तिची शिमला येथील वडिलोपार्जित मालमत्ता करारनाम्यावर नोंदविली होती. पण नंतर अलिशाने पैसे देण्यास नकार दिला. इतकेच नाही तर सिंह यांनी पैसे मागितल्यावर त्यांना, शारीरिक शोषणाच्या खोट्या प्रकरणात अडकविले जाण्याची धमकी दिली. त्यानंतर मात्र हताश होऊन सिंह यांनी पोलिसाकडे धाव घेतली. आता पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.