कांद्याच्या दरात (Onion Price) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा भाव पुन्हा एकदा प्रतिक्विंटल 5 हजार रुपयांच्या वर गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा मिळाला आहे. परंतू कांद्याचा भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांना मात्र महागाईचा (inflation) फटका हा बसला आहे. मागील आठवड्यात दर घसरल्याने बाजारपेठेत कांद्याचा भाव प्रतिक्विंटल 1 हजार रुपयांनी घसरला होता. त्यामुळे सोलापूर बाजारपेठेत शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी कांद्याची आवक घटली होती. (हेही वाचा - Maharashtra Unseasonal Rain: राज्य सरकारकडून अवकाळी पावसाचा आढावा, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात बैठक)
सोमवारी बाजारपेठेत 429 ट्रक कांदा इतकाच कांदा आला होता. त्यामुळे घसरलेला दर पुन्हा 5 हजारांवर पोहोचला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर, पुणे, सांगली जिल्ह्यातूनही कांद्याची आवक असते. याशिवाय कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा, आळंद, बिदर या भागांतूनही मोठ्या प्रमाणात कांदा सोलापुरात येतो. कांद्याच्या उत्पादनामध्ये घट झाल्याने त्याचा परिणाम हा त्याच्या मागणीवर झाला आहे.
दिवाळी सणात कांद्याचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर,सोलापूर बाजार समितीतील कांद्याचा दरही खाली आला आहे. दिवाळीनंतर सोलापूर यार्डात आवक वाढली होती. आता पुढील काही दिवस दर पाच हजारांच्या आसपासच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.