Onion Price Agitation: कांदा निर्यातशुल्क 40% पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि महाराष्ट्रात वांदा झाला. त्यावरुन राज्यात शेतकरी आक्रमक झाले. विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर प्रचंड आक्षेप घेत विरोध सुरु केला. शेतकऱ्यांनीही आंदोलन सुरु केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात कांदा हा केंद्रस्थानी आला. त्यावरुन निर्माण झालेला पेच सोडविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. काही प्रमाणात पेच सुटल्याची चिन्हेही दिसली. मात्र, त्यावरुन राजकीय श्रेयवाद सुरु झाला आणि शेतकऱ्यांच्या संतापात भर पडली. कांदा खरेदी आणि दराच्या मुद्द्यावरुन एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आंदोलन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिल्ली गाठत केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. दरम्यान, जपान दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी परस्परच ट्विट करुन झालेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवाद तर रंगला नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे.
धनंजय मुंडे आणि पियुष गोयल यांच्या भेटीत कांद्यावरील 40% निर्यातशुल्क रद्द करण्यावर चर्चा झाल्याचे समजते. या चर्चेनंतर तोडगा निघण्याची शक्यता असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी जपानहून फोनाफोनी करत भारतातील केंद्रीय नेत्यांशी, मंत्र्यासी चर्चा केली आणि सूत्रे हालवली. त्यातून मुंडे आणि गोयल यांच्या चर्चेतील तपशील बाहेर येण्यापूर्वीच फडणवीस यांनी ट्विटरद्वारे निर्णयाची माहिती दिली आणि मुद्दा परस्परच निकाली निघाल्याचे संकेत दिले.
ट्विट
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.
केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2023
फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल.
ट्विट
राज्यातील कांदा प्रश्नी आज केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री.पियुष गोयल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी केंद्र सरकार नाफेड मार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. @PiyushGoyal pic.twitter.com/fifx54tKA2
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 22, 2023
धनंजय मुंडे यांनीही ट्विटद्वारे माहिती देताना म्हटले आहे की, राज्यातील कांदा प्रश्नी आज केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री.पियुष गोयल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी केंद्र सरकार नाफेड मार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
ट्विट
देवेंद्रजी, जेव्हा शेतकरी बांधव प्रतिक्विंटल 300/400 रुपयाने कांदा विकत होते, तेव्हाच तुम्ही प्रतिक्विंटल 2410 रुपये भाव दिला असता तर शेतकरी बांधवांना सुद्धा फायदा झाला असता! पण दुर्दैव म्हणजे 4 वर्षे माझ्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असताना सरकारने त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा… https://t.co/RfWUT8h9NM
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 22, 2023
दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटरवच प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे. त्यांनी फडणवीस यांचे ट्विट कोट करुन रिट्विट करत म्हटले आहे की, देवेंद्रजी, जेव्हा शेतकरी बांधव प्रतिक्विंटल 300/400 रुपयाने कांदा विकत होते, तेव्हाच तुम्ही प्रतिक्विंटल 2410 रुपये भाव दिला असता तर शेतकरी बांधवांना सुद्धा फायदा झाला असता! पण दुर्दैव म्हणजे 4 वर्षे माझ्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असताना सरकारने त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिले नव्हते! त्यामुळे आता आमच्या शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे की आम्हाला प्रतिक्विंटल 4000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही!