कशेडी घाटात दरड कोसळल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतूक तब्बल 18 तासांनी सुरू
Landslide at Dhamandevi village (Photo Credits: ANI)

कशेडी घाटात (Kashedi Ghat) दरड कोसळल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) एकेरी वाहतूक तब्बल 18 तासांनी सुरू करण्यात आली आहे. गुरूवारी संध्याकाळी कशेडी घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, काल रात्रीपासून ही दरड उपसण्याचं काम सुरू होतं. अखेर 18 तासानंतर या महार्गावरील एकेरी वाहतूक सुरू झाली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर अडकलेल्या वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.

दोन ते तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पोलादपूर जवळील कशेडी घाटात धामणादेवी जवळ गुरुवारी संध्याकाळी दरड कोसळली होती. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतुक बंद पडली होती. परिणामी महामार्ग प्राधिकरण, स्थानिक प्रशासन आणि पोलीसांच्या मदतीने रात्री उशीरा दरड उपसण्याचे काम सुरू करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी दरड उपसण्याचे काम पुर्ण होईल, असा अंदाज होता. (हेही वाचा - Landslide In Kashedi: कशेडी घाटात दरड कोसळली, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रात्रभर ठप्प राहणार)

परंतु, दरड काढण्याचे काम सुरू असतानाचं पाऊस पडला. त्यामुळे दरड उपसण्याच्या कामात अडथळा आला. परिणामी रस्त्यावरील दरड काढण्याच्या कामात उशीर झाला. मात्र, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कशेडी घाटातील दरड उपसण्याचे काम पुर्ण झाले. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील केवळ एकेरी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण दरड उपसण्याचे काम झाल्यानंतर या महामार्गावरील दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.