Power Grid | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Load Shedding in Pune: महापारेषणच्या 400 केव्ही सुपर हाय व्होल्टेज चाकण आणि लोणीकंद सबस्टेशनवर ऊर्जेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे लोडमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे चाकण आणि लोणीकंद सबस्टेशनवर (Lonikand Substation) ओव्हरलोड (Overloading) होण्याची शक्यता कमी करण्यासाठी काही हाय व्होल्टेज सबस्टेशनमधील वीज ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा आपोआप खंडित झाला. त्यामुळे रविवारी दुपारी 2 वाजून 30 ते 60 मिनिटांपर्यंत पिंपरी, चिंचवड, भोसरी एमआयडीसी, गावठाण, मोशी, नाशिकरोड, चाकण एमआयडीसीमधील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

वृत्तानुसार, विजेच्या वाढत्या मागणीमुळे महापारेषण कंपनीच्या चाकण आणि लोणीकंद 400 केव्ही अल्ट्रा-हाय व्होल्टेज सबस्टेशनमधील भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या उच्चदाब सबस्टेशनमध्ये विजेचे अतिरिक्त भारनियमन करणे शक्य नसल्याने दुपारी अडीचच्या सुमारास स्वयंचलित यंत्रणेद्वारे वीज भारनियमन करण्यात आले. त्यामुळे पिंपरी विभागांतर्गत चिंचवड, रावेत, वाल्हेकरवाडी, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, वाकड व पिंपरीतील काही भागात दीड तास, भोसरी विभागांतर्गत भोसरी, नाशिकरोड, मोशी आणि भोसरी एमआयडीसीला सुमारे एक तास लोडशिडींगला सामोर जावं लागलं. (हेही वाचा -Pune: भाड्यावरून झालेल्या वादामुळे संतापलेल्या ऑटोचालकाने प्रवाशाच्या कानाला घेतला चावा; आरोपीविरोधात गुन्हा दाखल)

राजगुरुनगर विभागांतर्गत नाणेकरवाडी, कुरुळी, चकम एमआयडीसी चिमली, म्हाळुंगे, निघोजे, खालुंब्रे, सावरदरी, वासुली, शिंदे, बांभोली, वराळे, येळवडी, सांगुर्डी या गावांतील रहिवासी, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी 3.30 ते 4.30 वाजेपर्यंत अर्धा तास बंद ठेवावा लागला.

दरम्यान, वादळामुळे केसनांद येथे एका दुकानाचा लोखंडी पत्र्याचा बोर्ड विजेच्या खांबावर पडला. हा पोल वाकल्याने वीज ताराही तुटल्या आहेत. त्यामुळे केसनांद गाव व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसेच महापारेषणच्या लोणीकंद ते काटापूर आणि लोणीकंद ते रांजणगाव या 220 केव्ही हायव्होल्टेज वीज वाहिन्यांच्या आवश्यक दुरुस्तीच्या कामामुळे दुपारी 4.30 वाजता वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे वढू खुर्द, तुळापूर, फुलगाव आदी भागातील सुमारे दोन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रात्री अकरा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे.