राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारने 100 दिवस पूर्ण केल्यावर, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे अयोध्येचा (Ayodhya) दौरा करणार आहेत. सरकारच्या शतक दिवसपूर्ती निमित्त ते श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. सेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शंभर दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर अयोध्येला जातील असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी, उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी श्री राम मंदिराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला फैलावर घेतले होते. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात त्यांची पत्नी आणि मुलगा आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
संजय राऊत ट्विट -
सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!
प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2020
भाजप आणि शिवेसेनेमध्ये वितुष्ट आल्यावर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सरकार स्थापन केले. त्याआधी त्यांनी 28 नोव्हेंबरला शिवतीर्थावर (शिवाजी पार्क, दादर) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. येत्या मार्चमध्ये सध्याचे सरकार आपले 100 दिवस पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. (हेही वाचा: शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे? छगन भुजबळ यांनी केला महत्त्वाचा खुलासा)
रामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आता 55 दिवस झाले आहेत. याआधी 24 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे यांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी, अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी ते शिवनेरी किल्ल्यावरील माती अयोध्येत घेऊन गेले होते.