शिवथाळी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डची (Aadhar Card) सक्ती करण्यात आली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. यावर महाविकास आघाडीचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhgan Bhujbhal) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. शिवथाळी योजनेचा फायदा गरीबांनाच मिळावा व या योजनेचा गैरफायदा कुणी घेऊ नये याची आम्ही काळजी घेणार असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच शिवभोजनासाठी आधारकार्डची गरज लागणार नाही, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. 10 रुपयांच्या या थाळीसाठी फेशियल रेगन्शिशनसाठी फोटो व आधार कार्ड दाखवावे लागेल असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले. यावरून मोठ्या प्रमाणात उलट सुलट बातम्याही पसरु लागल्या आहेत. मात्र यात तथ्य नसल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात 26 जानेवारी पासून शिवथाळी योजनेची सुरुवात होणार आहे. परंतु, शिवथाळी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डची सक्ती केली जाणार आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. यातच मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर छगन भुजभळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आधारकार्डबाबत महत्वाचा खुलासा केला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी शिवभोजन थाळीला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच शिवथाळीची सुरुवात करणाऱ्या दुकानदाराकडून आधारकार्ड मागितले जाणार आहे. नागरिकांचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे देखील वाचा- मनसे च्या महाअधिवेशनाला वीज पुरवठा बंद? 'सरकारचा खालच्या पातळीवरील प्रयत्न' म्हणत संदीप देशपांडे यांनी केली टीका
शिवभोजन थाळीत 2 चपात्या, प्रत्येकी 1 वाटी भाजी, भात, वरण आदीचा समावेश असेल. या थाळीची किंमत शहरी भागात 50 तर, ग्रामीण भागात 35 रुपये आहे. कंत्राटदाराला 10 रुपयात ती द्यावी लागेल. उर्वरित रक्कम त्याला शासनाकडून अनुदानाच्या रुपात प्राप्त होईल.