World No Tobacco Day 2020: आज 'जागतिक तंबाखू विरोधी दिना'निमित्त राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी राज्यातील जनतेला तंबाखू मुक्तीची शपथ देताना महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याची शपथ घेतली आहे. आतापर्यंत राज्यातील 224 तंबाखू मुक्ती केंद्रांच्या माध्यमातून सुमारे साडेपाच लाख रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचेदेखील राजेश टोपे यांनी सांगितले आहे. याशिवाय राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान प्रतिबंध आणि रस्त्यावर थुंकण्यास बंदी घातली आहे.
दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 26 हजार 418 शाळा आणि 2442 आरोग्य संस्था तंबाखू मुक्त करण्यात आल्या आहेत. तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत सुमारे 6 कोटी 54 लाख 24 हजार 430 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 224 तंबाखू मुक्ती केंद्राच्या माध्यमातून 5 लाख 41 हजार 415 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून 25 हजार 275 जण तंबाखू मुक्त करण्यात आले आहेत. तसेच जुलै 2018 पासून राज्यात हुक्का बंदी करण्यात आली आहे. गेली 4 वर्ष राज्यामध्ये मौखिक कर्करोग तपासणी शिबिरे देखील घेण्यात आली आहेत, असंही राजेश टोपे यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र: जून मध्ये कोणत्याही परिस्थितीत शालेय वर्ष सुरु होण्यासह शक्य तिथे शाळा सुरु करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिक्षण विभागाला निर्देशन)
#जागतिकतंबाखूविरोधीदिन निमित्त आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांनी राज्यातील जनतेला तंबाखू मुक्तीची दिली शपथ. तसेच मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन, अशी शपथही घेतली.#WorldNoTobaccoDay2020 pic.twitter.com/uDdTdHSEXl
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 31, 2020
आज राजेश टोपे यांनी शासकीय निवासस्थानी तंबाखू विरोधी शपथ देताना मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करील, अशी शपथ घेतली. आज जगभरात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून देशात तसेच राज्यात तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही. परंतु, आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याची शपथ घेतली आहे.