Uddhav Thackeray | (Photo Credit: Facebook)

देशभराला आर्थिक मंदी (Financial Recession) हा प्रकर्षाने सतावणारा त्रास सध्या चर्चेचा मूळ मुद्दा बनला आहे. अशातच वाहन उद्योगात सातत्याने येणारी घसरण चिंतेचा विषय ठरत आहे. पण ही मंदी नेमकी आली कशामुळे यावर शिवसेना (Shivsena) अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी तर्क लावत उत्तर दिले आहे. उद्धव यांच्या मते ओला-उबरच्या (Ola- Uber) वाढत्या मागणीमुळे सध्या बेस्ट (BEST) बसच्या वाहतुकीला सुद्धा जबर फटका बसला आहे. वास्तविक अशाच आशयाचे एक विद्धान अलीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सुद्धा केले होते, ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीसाठी सीतारामन यांनी ओला उबरला दोषी ठरवले होते, हा प्रसंग आणि त्यावरील टीका अगदी ताज्या असताना आता उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे.

प्राप्त माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे आज मुंबई येथे बेस्टच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यामध्ये त्यांच्या हस्ते 6 मिनी वातानुकूलित बसेसचे लोकार्पण करण्यात आले.उद्धव यांनी देशातील मंदीविषयी भाष्य करताना मंदी दीर्घकाळ टिकणार नाही असा विश्वास दर्शवला आहे. " एक दिवस मंदीही जाईल, काळानुसार सुधारणा करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आता बेस्ट मध्येही सुधारणा होत आहेत, कितीही संकट आली तरी बेस्टच्या एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही असे आश्वासन सुद्धा ठाकरे यांनी दिले आहे.

दरम्यान, निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यानंतर त्यांना सोशल मीडियामध्ये जबदरदस्त ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी या मंदीसाठी मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न करत देशाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. खास म्हणजे, शिवसेनेने सुद्धा मुखपत्र सामना मधून मनमोहन यांच्या विधानाला दुजोरा दिला होता.