Uddhav Thackeray: रायगड जिल्ह्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षप्रवेश
Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited)

भारतमातेला पुन्हा एकदा गुलाम करण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेविरोधात आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. आताची लढाई ही साधीसुधी नाही. ही लढाई स्वातंत्र्य टिकविण्याची लढाई आहे. त्यासाठी सर्वांनी सोबत यावे, असे उद्गार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काढले आहेत. रायगड (Raigad) येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. खास करुन रियाज बुबेरा यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. रियाज बुबेरा हे काँग्रेसचे उपाध्य होते. महत्त्वाचे असे की, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थीतीवर न्यायालयात आज सुनावणी सुरु आहे. असे असतानाही ठाकरे गटामध्ये होत असलेले पक्षप्रवेश हे राजकीय वर्तुळात कौतुकाचा विषय ठरत आहे.

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकदा आक्रमक होत म्हटले की, सध्याची लढाई ही स्वातंत्र्य टिकविण्याची आहे. त्यामुळे या लढाईत अनेक लोक शिवसेनेसोबत (उद्धव ठाकरे) जोडले जात आहेत. अनेकदा शिवसेनेवर आरोप केला जात आहे की, शिवसेनेने हिंदूत्व सोडलं. शिवसेनेने हिंदुत्त्व सोडलं म्हणजे नेमकं काय केलं? मध्यंतरी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत जाऊन आले, तेव्हा त्यांनी काय सोडलं होतं? मध्यंतरी संघसरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे हे म्हणाले गोमांस खाणाऱ्यांना हिंदूत्त्वातून वगळता येणार नाही, तेव्हा त्यांचं हिंदुत्त्व काय आहे? त्यामुळे हिंदुत्त्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे, असे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं आहे. इतकेच नव्हे तर, जो देशद्रोही असतो तो आपला विरोधक. मग तो कोणत्याही जातीधर्माचा का असेना, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Shiv Sena Party Symbol: शिवसेना कोणाची? शिंदे-ठाकरे गट सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात होणार महत्त्वपूर्ण सुनावणी)

दरम्यान, प्रसारमाध्यमांवर घातली जाणारीअप्रत्यक्ष बंदी. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांवर घातलेल्या जाणाऱ्या धाडी हे कशाचे द्वेतक आहे? असा सवाल उपस्थित करतानाच देशातील भारतमाता पुन्हा एकदा हिंदुत्त्वाच्या नावाखाली गुलामगिरीत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांविरोधात आपण देशप्रेमी लोकांनी पुन्हा एकदा एकत्र यायला हवे, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत.