Shiv Bhojan Thali: आता शिवभोजन थाळी मिळणार पार्सल स्वरूपात; मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश 
Shivbhojan Thali (PC - Twitter)

महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. सध्या उपहारगृहे बंद ठेवण्यात आली असून पार्सल सुविधा उपलब्ध आहे. आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी, राज्यात शिवभोजन थाळीदेखील (Shiv Bhojan Thali) पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केला नसून, पूर्वीप्रमाणेच 5 रूपयात शिवभोजन थाळी जनतेला उपलब्ध होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावरदेखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मंत्री भुजबळ म्हणाले, सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो त्यामुळे सर्वांनी राज्य शासनाला सहकार्य करावे असे आवाहनदेखील भुजबळ यांनी केले आहे. (हेही वाचा: Mumbai: मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय; गेल्या 3 दिवसातील रुग्णांची संख्या चिंताजनक, पाहा संपूर्ण आकडेवारी)

दरम्यान, राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दराने जेवण उपलब्ध करून देण्यासाठी, गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. शिवभोजन थाळीत दोन चपात्या, एक मूद भात, एक वाटी भाजी आणि एक वाटी वरणाचा समावेश करण्यात आला. भोजनालय सुरू करण्यासाठी सुरू असलेली खानावळ, बचत गट, रेस्टॉरंट किंवा मेस यातून सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात आली आहे.