CIDCO (संग्रहित संपादित प्रतिमा)

CIDCO Homes For Journalists: शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (CIDCO) बांधलेले घर खरेदी करू इच्छिणाऱ्या पत्रकारांना (Journalists) पात्रता प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. अर्जदारांना लॉटरी सोडतीत घरे वाटप झाल्यास पात्रता सिडको तपासेल. सिडको सदनिका खरेदी करू इच्छिणाऱ्या पत्रकारांना यापूर्वी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून (DGIPR) पात्रता प्रमाणपत्र घ्यावे लागत होते. परंतु, ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने अपार्टमेंटचे वाटप करण्यास विलंब होत होता.

मात्र, आता पात्रता प्रमाणपत्र देण्याच्या अटीमध्ये शिथिलता मिळाल्याने पत्रकारांना सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत अपार्टमेंट मिळणे अधिक सुलभ झाले आहे. तसेच या निर्णयामुळे पत्रकांरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. (हेही वाचा -Saamana Editorial: शिवसेनेशी दोन हात करता येत नाहीत, म्हणून फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचे हेच तर मिशन: सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा)

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांना सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत अपार्टमेंट मिळणे सोपे व्हावे यासाठी शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने पात्रतेची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. शिंदे म्हणाले की, "समाज आणि सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणार्‍या पत्रकारांप्रती ही शिथिलता कृतज्ञतेचा इशारा आहे." डीजीआयपीआरकडून पात्रता प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत शहरातील पत्रकारांनी नियोजन प्राधिकरणाकडे तक्रार केली होती.

दरम्यान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी सांगितलं की, "सिडकोने पत्रकारितेशी निगडीत उपक्रमांचा नेहमीच गौरव केला आहे आणि पाठिंबा दिला आहे. यावेळीही राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने पात्रतेची अट शिथिल केली आहे. ज्यामुळे पत्रकारांना सिडको गृहनिर्माण योजनेंतर्गत अपार्टमेंट अधिक सहजतेने मिळू शकेल,"

सिडको सातत्याने त्यांच्या योजनांद्वारे नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देते. इतर विविध श्रेणींसह पत्रकारांसाठीदेखील सिडकोमध्ये सदनिका राखीव ठेवण्यात येत असतात.  सिडकोने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा अनेक पत्रकार बंधू-भगिनींना होणार आहे. तसेच नवी मुंबईसारख्या पायाभूत सुविधांनी परिपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात हक्काचे घर घेण्याचे त्यांचे स्वप्न साकार होणार आहे.