वसई पालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलनप्रकरणी मनसेचे (MNS) ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना पुढील दोन वर्षांसाठी तडीपार होण्याटी नोटीस पाठवण्यात आली आहे. अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी अविनाश जाधव यांना खुलासा करण्यासाठी 4 ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यामातून दिली आहे. दरम्यान, मी गेली अनेक वर्ष सातत्याने लोकांसाठी आंदोलन करत आलो आहे.मी स्वत:साठी कोणतेही आंदोलन केलेले नाही, असेही ते म्हणाले आहेत.
“मी गेली अनेक वर्ष सातत्याने लोकांसाठी आंदोलन करतोय. कोणतेही आंदोलन मी स्वत:साठी केले नाही. वसईतही जे आंदोलन केले होते ते कोविड सेंटरसाठी केले होते. आजही विदर्भ, मराठवाडा, सांगली, सातारा येथून आलेल्या मुलींसाठी आंदोलन करत आहे. आंदोलन सुरु असतानाच मला तडीपारीची नोटीस आली आहे. मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांमधून मला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ठाण्यात एवढे गुंड आहेत ते हद्दपार होत नाहीत. मी लोकांसाठी सातत्याने भांडत असतानाही मला तडीपारीची नोटीस पाठवली जाते. लोकांसाठी कोणी भांडायचे नाही का? माझी पहिली सभा झाली तेव्हा मला एक कोटींचा दंड लावला होता. त्याचदिवशी मला तडीपारीच्या नोटीस येतील, असे म्हटले होते. लोकांचे काम करतो, समस्या सोडवतोय म्हणून मला हे महाराष्ट्र शासनाकडून मिळालेले बक्षीस आहे,” असे अविनाश जाधव फेसबूक लाईव्हच्या माध्यामातून लोकांशी संवाद साधला आहे. हे देखील वाचा- 'शुभ बोल रे नाऱ्या...' मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया
अविनाश जाधव यांचे फेसबूक लाईव्ह-
कोरोनाच्या काळात अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने होताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबईत ‘थायरोकेयर लॅब’विरोधात आंदोलन केले होते. या लॅबमधून कोरोनाचे चुकीचे रिपोर्ट येत असल्याच्या तक्रारीनंतर अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी ही लॅब बंद पाडली होती.