BDD चाळ पुनर्विकासात कोणीही बेघर होणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

बीडीडी चाळ पुनर्विकासात (BDD Chawls Redevelopment) कोणीही बेघर (Homeless) होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले की, बीबीडी चाळीचा पुनर्विकास होताना चाळीतील प्रत्येक कुटुंबाचे पुनर्वसन होईल, याची काळजी घ्या.  बीडीडी चाळ पुनर्विकास हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे तो सुनियोजितपणे पूर्ण होईल असे प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.

त्याचबरोबर अशा चाळीतील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या घरांबाबत निर्णय घेण्यासाटी मंत्रीस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. तसंच पोलिस क्वार्टरच्या पुनर्विकासाची व पुनर्वसनाची रूपरेषा तयार करण्यासही सांगितले आहे. बीडीडी चाळीत राहणाऱ्या निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आणि मृत पोलिसांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय उपलब्ध करुन देणे आणि त्यांचे नियोजन करणे या मुद्द्यांवर देखील बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे प्रमुख सचीव सिताराम कुंटे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Tata Cancer Center सदनिकांवरुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्यात आरोप प्रत्यारोप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्णयाला स्थगिती)

1930 पासून मुंबईत बीडीडी चाळी उभ्या राहू लागल्या. त्यानंतर कर्मचारी वर्गासाठी त्यांचे निवासस्थान बनल्या. मात्र यातील बऱ्याच चाळी आता मोडकळीस आल्या आहेत. विशेष म्हणजे या चाळी मुंबईतील प्रमुख भागात आहेत.