सीमेवर युद्ध नसताना जवान का शहीद होत आहेत? आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोदी सरकारला सवाल
मोहन भागवत | (Photo Credits: IANS)

देशाच्या सीमेमवर (Border) युद्ध ( War) सुरु नाही. तरीसुद्धा देशाचे जवान का शहीद होत आहेत? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ( RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केंद्रातील मोदी सरकारला घरचा आहेर दिला. तसेच, असे घडत आहे कारण आपण आपले काम योग्य पद्धतीने करत नाही. दरम्यान, भागवत यांनी अशा प्रकारचे विधान करुन भाजपच्या वरिष्ठे नेत्यांचे एकप्रकारे कानच उपटले आहेत. हे विधान म्हणजे भविष्यातील भाजपच्या नेतृत्वबदलाचे हे संकेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

नागपूर येथील प्रहार समाज जागृती संस्थेच्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. या वेळी बोलताना भागवत म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. देश इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा देशासाठी प्राण देण्याचा काळ होता. मात्र. स्वातंत्र्यानंतर जर कोणाशी युद्ध झाले तर शत्रूसोबत लढण्यासाठी जवान प्राणाची बाजील लावतो. पण, सध्या तर असे कोणतेच युद्ध नाही. तरीही आमचे जवान शहीद होत आहेत. युद्ध नसेल तर जवान शहीद होण्याचे काहीच कारण नाही. पण असे होत आहे. देशाच्या सीमेवर शहीद होत असलेल्या जवानांबद्धल केवळ चिंता करुन उपयोग नाही तर, त्याबात ठाम पावले उचलनेही आवश्यक आहे. (हेही वाचा, खळबळजनक: डोंबिवलीत भाजप शहर उपाध्यक्षाच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त)

दरम्यान, या वेळी बोलताना भागवत यांनी गेल्या सत्तर वर्षात देशाचा विकास झाला. मात्र, युरोप, इस्त्राईलच्या तुलनेत व्हायला हवा होता तितका झाला नाही. देशाचा विकास करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. या प्रक्रियेत सर्वांनी सोबत यायाल हवे. देशाचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, असेही भागवत यांनी म्हटले. दरम्यान, भागवत यांचे विधान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांना दिलेले एकप्रकारे उत्तरच आहे. गेल्या सत्तर वर्षांमध्ये काँग्रेसच्या काळात देशाचा काहीच विकास झाला नाही, असे पंतप्रधान मोदी सतत सांगत आले आहेत. काँग्रेसवर टीका करताना मोदी आपल्या प्रत्येक भाषणात गेल्या 70 वर्षांतला हिशोब मागत असतात. त्यामुळे भागवत यांचे विधान म्हणजे पंतप्रधान मोदींना एकप्रकारे धक्का असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मानने आहे.