महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. दरम्यान, राज्यातील विविध शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. यातच नाशिक येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथे ऑक्सिजन बेड (Oxygen Bed) मिळत नसल्याने एका कोरोनाबाधित रुग्णांने थेट महानगरपालिकाच (Nashik Municipal Corporation) गाठली आहे. या रुग्णाने ऑक्सिजनचा सिलिंडर घेऊन महापालिकेच्या आवारात ठिय्या मांडला आहे. या प्रकारानंतर सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित रुग्ण हे नाशिकच्या सिडकोतील रहिवाशी आहेत. त्यांना 3 दिवसांपू्र्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांची प्रकृती खालावली असतानाही त्यांना बेड मिळाला नाही. दरम्यान, या रुग्णाला बेड मिळावा म्हणून लोकप्रतिनिधींनी खाजगी रुग्णालयांना विनंती केली. मात्र, त्यांनाही दाद मिळाली नाही. परंतु, ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने या रुग्णाने नाशिक महापालिकाच गाठली. तसेच महापालिकेच्या राजीव गांधी भवन प्रवेशद्वारात ठिय्या मांडला. त्यानंतर खडबडून जाग झालेल्या प्रशासनाने त्यांना नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रातून गेलेल्या प्रवाशाचा श्रीनगर मध्ये COVID19 मुळे मृत्यू
नाशिक जिल्ह्यात आज (31 मार्च) एकूण 3 हजार 308 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाला आहे. तर, 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नाशिक येथील कोरोनबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 81 हजार 522 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 52 हजार 487 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 2 हजार 392 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आज 39544 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 23600 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2400727 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 356243 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.34% झाले आहे.