अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळ (Nisarga Cyclone) घोंगावत असून पुढील दोन दिवस त्याचा प्रभाव रायगडपासून मुंबई, ठाणे, पालघर, गुजरातवर राहणार आहे. बुधवारी वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटर पोहचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यातच वांद्रे कुर्ला संकुलात (BKC) येथील कोविड सेंटरलाही (Covid Center) निसर्ग चक्रीवादळाचा धोका बसण्याची शक्यता आहे. यामुळे बीकेसी येथे बांधण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील 150 रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यास सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथे एनडीआरएफची प्रत्येकी एक टीम तैनात करण्यात आली होती. मात्र, हवामान खात्याने आज दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आता हे वादळ अलिबागला धडकणार आहे. त्यामुळे अलिबागला एनडीआरएफच्या 4 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने 1 हजार खाटांचे कोविड केंद्र उभारून दिले होते. तसेच बीकेसी येथील मैदानात उभारण्यात आलेल्या या केंद्रावर पावसाचा कोणताही परिणाम होणार नाही. तसेच 80 ते 100 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामध्येही रुग्णालयाचे बांधकाम टिकाव धरेल, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून येथून रुग्ण हलविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 60 रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यातही आले आहे. हे देखील वाचा-मुंबई: धारावीत आज कोरोनाच्या 25 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1830 वर पोहचला तर 71 जणांचा बळी- BMC
कोरोना विषाणू वाढत्या प्रादुर्भावासोबतच महाराष्ट्रासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर निसर्ग चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 3 जून म्हणजे उद्या पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते.