निवडणुकीच्या तोंडावर निलेश राणे यांना धक्का; महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश
निलेश राणे (Photo Credit : Twitter)

सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर अनेक नाट्यमय घटना घडताना दिसत आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यांमधील मतदान आता बाकी आहे, अशात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे (Maharashtra Swabhiman Party) सर्वेसर्वा नारायण राणे (Narayan Rane) यांना फार मोठा फटका बसला आहे. मतदान आता दोन दिवसांवर आले असताना पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष यांच्यासह तब्बल 18 पदाधिकाऱ्यांना शिवसेनेते प्रवेश केला आहे. अचानक घडलेल्या या गोष्टीमुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे (Nilesh Rane) यांना चांगला धक्का बसला आहे.

शिवसेनेचे उमेदवार आणि खासदार विनायक राऊत, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱयांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा फार पडला. त्यानंतर लगेच त्यांनी या निवडणुकीसाठी शिवसेनेला पाठींबा दर्शवला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेनेकडून विनायक राऊत आणि काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हे सर्व तगडे उमेदवार असल्याने ही लढत चुरशीची होणार असे बोलले जात होते. मात्र आता पदाधिकाऱ्यांच्या सेनाप्रवेशाचा फटका निलेश राणे यांना बसणार अशी चर्चा रंगत आहे. दरम्यान, नुकतेच काँग्रेस पक्षाच्या माजी प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी पक्ष सोडला आहे. त्यांनी 19 एप्रिल रोजी, शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. (हेही वाचा: काँग्रेस पक्ष राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'जय महाराष्ट्र' म्हणत बांधले शिवबंधन)

शिवसेनेते गेलेले जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी - पक्षाचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, गुहागर तालुकाध्यक्ष राजेंद्र साळवी, खेड तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, महिला जिल्हाध्यक्ष मेघना मंगेश शिंदे, स्वाभिमान कातकरी समाज जिल्हाध्यक्ष विलास निकम, दिप्ती चव्हाण, विलास जाधव, विश्वनाथ शेट्ये, प्रकाश निवाथे, राजेंद्र साळवी, राजेंद्र शिंदे, शशिकांत निकम, संजय जगताप, दीपक चव्हाण, कपिल काताळकर, मनोज पवार, शशिकांत शिंदे, निता निकम