Narayan Rane: समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ- निलेश राणे
Nilesh Rane | (File Image)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत व्यक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिवसेना (Shiv Sena) पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, माजी खासदार आणि नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे (Nilesh Rane) यांनी म्हटले आहे की, ''कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ''.

दरम्यान, शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी नारायण राणे यांना तीव्र शब्दात इशारा दिला आहे. संजय गायकवाड यांनी म्हटले आहे की, 'नारायण राणे यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही कारवाई करु. नारायण राणे यांचे वक्तव्य बेतालपणाचे नव्हे तर मस्तवालपणाचे आहे. केंद्रीय मंत्रीपद मिळून एक महिना काय झाला तोवर सत्ता डोक्यात गेली आहे. यापुढे जर अशी विधाने केली तर घरात घुसून हिशोब चुकता करु' असा इशाराही संजय गायकवाड यांनी नारायण राणे यांना दिला आहे. 'अनेक पक्ष बदलून हा कोंबडीचोर या शेतातून त्या शेतात जातो. एक एक शेत खाऊन बेडूग दुसऱ्या शेतात उडी मारतो' असा टोलाही संजय गायकवाड यांनी लगावला आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे जोरदार पडसाद उमटत आहेत. प्रामुख्याने शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. युवा सेनेच्या शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर गर्दी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. (हेही वाचा, Narayan Rane: नारायण राणे यांची गुन्हा दाखल झाल्यानंत पहिली प्रतिक्रिया)

ट्विट

नारायण राणे यांच्यावर कलम 500, 502, 505,153 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांचे विधान समाजात द्वेश आणि तेढ निर्माण करणारे ठरु शकते. या शिवाय त्यांच्या विधानावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार नारायण राणे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे.