राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उदयनराजे भोसले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमिवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शरद पवार यांना 'जानता राजा' (Janata Raja) संबोधला जाण्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी म्हटले आहे की, 'मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा'. महत्त्वाचे म्हणजे शिवाजी महाराज यांची छत्रपती ही खरी उपाधी असल्याचेही पवार यांनी सांगितले. खाटाव-माण साखर कारखाना येथे साखरेच्या 251001 पोत्यांचे पूजन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
शरद पवार या वेळी बोलताना म्हणाले, शिवाजी महाराज यांची छत्रपती ही खरी उपाधी आहे. राजा हा शब्द रामदास स्वामी यांनी आणला. ते काही शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. त्यांच्या खऱ्या गुरु या राजमाता जिजाऊ होत्या शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी ही तर लेखणीची कमाल आहे. त्यामुळे छत्रपती हीच खरी शिवाजी महाराज यांची खरी उपाधी, असल्याचे शरद पवार यांनी ठणकाऊन सांगितले. तसेच, मी आजवर कधीच म्हटले नाही की, मला जाणता राजा म्हणा, असेही पवार या वेळी म्हणाले. (हेही वाचा, लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे काय? 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनानंतर उदयनराजे भोसले यांचा संतप्त सवाल)
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन भाजप कार्यालयात झाले होते. या पुस्तकाचा लेखकही भाजप नेता आहे. त्यामुळे या पुस्तकावरुन निर्माण झालेल्या वादात भाजपवर टीका करण्यात आली. तसेच, भाजप या वादाच्या केंद्रस्थानी आला होता. दरम्यान, हे पुस्तक मागे घेतल्याचे भाजपच्या काही नेत्यांनी सांगीतले आहे. त्यावरुन या वादावर पडदा पडल्याचे चित्र आहे. मात्र, या वादाला अनुषंगून या आधी केलेल्या आरोप प्रत्यारोप आणि टीका टीपण्णीला दिली जाणारी प्रश्नोत्तरं कायम आहेत, असेच दिसते आहे.