Supriya Sule | (Photo Credits: Facebook)

औरंगबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण (Paithan) येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या समोरच कार्यकर्त्यांच्या दोन गटात राडा झाला. अचानक सुरु झालेल्या या राड्यामुळे कार्यक्रम काही काळ बंद पडला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वत: हस्तक्षेप केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. पुढील कार्यक्रम सुरु झाला. संजय गोर्डे आणि धनंजय वाकचौरे या दोन नेत्यांच्या गटामध्ये हा राडा झाला.

सुप्रिया सुळे या दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रम, मेळावे आदींचे आयोजन केले आहे. सुप्रिया सुळेही या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहेत. दरम्यान, आज औरंगाबाद येथील पैठण येथे त्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. या कार्यक्रमावेळीच संजय गोर्डे आणि धनंजय वाकचौरे यांचा गट आमनेसामने आला. (हेही वाचा, CAA च्या पाठिंब्यावरून वरून शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद)

प्राप्त माहितीनुसार, संजय गोर्डे आणि धनंजय वाकचौरे या दोन गटांमध्ये गेले प्रदीर्घ काळ राजकीय संघर्ष सुरु आहे. या संघर्षाला विधानसभा निवडणूक तिकीटवाटपाची किनार आहे. तेव्हापासून या दोन्ही गटांमध्ये नेहमीच शहकाटशहाचे राजकारण पाहायला मिळते. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात त्याचे पडसाद उमटताना दिसले. ज्यामुळे कार्यक्रम काही काळ थांबवावा लागला.