Supriya Sule (Photo Credits: Twitter)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) लॉकडाऊन आहे. परिणामी, उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी बंद आहेत. मात्र, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या अनेक निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. परंतु, अद्यापही राज्यातील जीम (Gyms) बंदच आहेत. यामुळे राज्यातील जीम सुरु करण्यात यावी, अशा मागणींनी अधिक जोर धरला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही महाराष्ट्रात जीम उघडण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे”, अशा आशयाचे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. हे देखील वाचा- खुशखबर! महाराष्ट्रात आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ST Bus ला परवानगी

सुप्रिया सुळे यांचे ट्वीट-

याआधी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच जिम सुरु करण्याचा मुद्दा महाराष्ट्र सरकारकडे उचलून धरण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी “जिम ओपन करा, बघू काय होते” असा सल्ला दिला होता. त्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सुरु करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, अद्यापही राज्य सरकारकडून जीमबाबात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.