Joe Biden यांच्या सभेचा Sharad Pawar यांच्या सातारा सभेशी संबंध जोडत रोहित पवार यांनी बांधला अमेरिकेतही सत्तांतर अंदाज; पहा ट्विट
NCP MLA Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ((NCP MLA) रोहित पवार (Rohit Pawar) यांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हे ट्विटही तितके आगळवेगळे आहे. अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणूकीची धामधूम आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) भाषण करत असताना जोरदार पाऊस सुरु झाला. याचे व्हिडिओजही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. याचा थेट संबंध रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान साताऱ्यातील भाषणाची जोडला आहे. त्यावेळेसही असाच मुसळधार पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर सत्तांतर झाले. अमेरिकेतही त्याचेच संकेत आहेत का, असा अंदाज रोहित पवार यांनी ट्विटमधून वर्तवला आहे.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. 2019 ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे!" (पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं- रोहित पवार)

रोहित पवार ट्विट:

दरम्यान, अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचे आव्हान आहे. जो बायडन फ्लोरिडा येथील सभेत भाषण करत असताना जोरदार पाऊस सुरु झाला. असा प्रसंग शरद पवार यांच्या सातारा सभेतील भाषणादरम्यान उद्भवला होता. मात्र भरपावसात अजिबात विचलित न होता शरद पवार यांनी भाषण करत अनेकांची मने पुन्हा एकदा जिंकली आणि महाराष्ट्राने सत्तांतर अनुभवले. दोन्ही सभांमधील हा समान धागा लक्षात घेत रोहित पवार यांनी वर्तवला हा अंदाज कितपत खरा ठरतो, येत्या पुढील काळात स्पष्ट होईलच.