NCP LGBT Cell (Photo Credit : Twitter)

काही वर्षांपूर्वी ‘एलजीबीटी’ (LGBT) समुद्याला एक ओळख बहाल करून सर्वोच्च न्यायालयाने फार महत्वाचा निर्णय दिला होता. त्यानंतर एलजीबीटी लोकांबाबत होणारा भेदभाव विविध ठिकाणी कमी व्हायला सुरुवात झाली. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने (National Congress Party) सोमवारी आपला लेस्बियन, समलिंगी, उभयलिंगी आणि ट्रान्सजेंडर सेल (LGBT Cell) स्थापन केला. असे पाऊल उचलणारा देशातील पहिला राजकीय पक्ष असल्याचा दावा एनसीपीने केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच महाराष्ट्र, अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या हस्ते मुंबईत एलजीबीटी सेलच्या कामकाजाचा औपचारिक शुभारंभ झाला.

महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याएलजीबीटी सेलच्या घोषणेसोबत एलजीबीटी समुदायातील सदस्यांना समान वागणूक देण्याची तयारी दर्शविली. यावेळी त्यांनी प्रिया पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत 13 जण एलजीबीटी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्यांदा 'युवती' सेलची स्थापना केली होती. आता वंचित घटकांना न्याय देण्यासाठी एलजीबीटी सेल स्थापन करण्यात आला आहे.'

एएनआय ट्वीट -

एनसीपीने आपल्या सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, एलजीबीटी समूहाला सामाजिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी व त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एलजीबीटी सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलच्या  माध्यमातून समलैंगिक समूहाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा उद्देश आहे. तसेच, सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी समलैंगिक समूहाच्या प्रश्नांसाठी वेल्फेअर बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता, त्याबाबतही आगामी काळात पुढाकार घेणार असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. (हेही वाचा: समलैंगिक कर्मचाऱ्यांसाठी Tata Steel ने उचलले मोठे पाऊल; मागवली जोडीदाराची माहिती, मिळणार सर्व सुविधा)

महाराष्ट्रात एल.जी.बी.टी समूह 10-12 % आहे. त्यांच्या प्रश्नांची दखल समाजाकडून घेतली जात नाही, मात्र या सेलच्या माध्यमातून आम्ही त्यांची दखल घेऊ, समानता, रोजगाराबाबत पुढाकार घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणू, असा विश्वास सेलच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया पाटील यांनी व्यक्त केला.