सप्टेंबर 2018 साली सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय घेत, एलजीबीटी (LGBT) लोकांसाठी असणारे कलम 377 रद्द केले. त्यानंतर आता समाजामध्येही याबाबत जागरुकता वाढत आहे. आता टाटा स्टीलने (Tata Steel) एक नवीन एचआर पॉलिसी आणली आहे, ज्याअंतर्गत कंपनीच्या एलजीबीटीक्यू कर्मचाऱ्यांना त्यांच्या जोडीदाराची माहिती विचारली गेली आहे. एलजीबीटीक्यू कर्मचाऱ्यांच्या जोडीदारालाही कंपनीकडून लाभ मिळणार आहेत. या मानव संसाधन धोरणात म्हटले आहे की, जोडीदाराची माहिती दिल्यानंतर इतर स्ट्रेट कर्मचाऱ्यांच्या जोडीदाराला मिळणाऱ्या सर्व सुविधा त्यांनाही मिळणार आहे. हा उपक्रम जमशेदपूर येथील स्टील उत्पादकांच्या कार्यालयात सुरु करण्यात आला आहे.
एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, ‘सर्व कर्मचार्यांना समान संधी देणे, प्रत्येकाला समान सन्मान मिळणारे वातावरण तयार करणे हे कंपनीचे कर्तव्य आहे.’ विविधता आणि समावेशन धोरणांतर्गत एलजीबीटी कर्मचार्यांना बरेच फायदे मिळतील. या अंतर्गत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सुविधा, अडॉप्शन रजा, मुलांची काळजी यासारख्या सुविधांचा समावेश असणार आहे. जोडीदार म्हणजे विवाहित जोडप्यांप्रमाणे एकत्र राहणाऱ्या समलैंगिक व्यक्ती.
लिंग बदल शस्त्रक्रियेसाठीही कर्मचार्यांना आर्थिक मदत आणि 30 दिवसांची रजा यांसारख्या सुविधा कंपनी पुरवणार आहे. नव्या धोरणांतर्गत अशा कर्मचार्यांना टाटा एक्झिक्युटिव्ह हॉलिडे पॅकेज (टीईएचपी) अंतर्गत हनिमून पॅकेजेस आणि घरगुती प्रवासाची सुविधा मिळेल. अशा कर्मचार्यांना त्यांच्या जोडीदारासह नवीन ठिकाणी स्थानांतरित करायचे असल्यास कंपनी त्यांना प्राधान्य देईल. त्याच वेळी, अशा कर्मचार्यांना सामान्य कर्मचार्यांप्रमाणेच कोणत्याही अधिकृत बैठकीत किंवा परदेशात आयोजित कोणत्याही कॉर्पोरेट कार्यक्रमात भाग घेण्याची संधी देखील मिळेल. टाटा स्टीलच्या सर्व लोकेशन्सवर हे नवीन धोरण लागू करण्यात आले आहे.