राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांचा 11 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश; सोबत 55 नगरसेवकही हाती घेणार कमळ
Ganesh Naik | (Photo: Facebook)

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने कंबर कसत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र राष्ट्रवादीला (NCP) मिळत असलेले धक्क्यांचे सत्र काही संपत नाही. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) हे राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडेल. गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईकांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरु होती. त्याला आता 11 सप्टेंबरचा मुहूर्त मिळाला आहे.

वाशी (Vashi) येथील सिडकोच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबईचे नेते गणेश नाईक यांच्या सोबत नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीचे 55 नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यापूर्वी 31 जुलै रोजी गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना  राष्ट्रवादीच्याच 22 आणि अपक्ष 4 नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. तसेच गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईकही भाजपवासी झाले आहेत त्यानंतर आता महिन्याने गणेश नाईक स्वतःला भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. (हेही वाचा: छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाचे फेटाळले वृत्त; आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती)

दरम्यान, गणेश नाईक हे तब्बल 15 वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. गणेश नाईक यांच्याच जोरावर राष्ट्रवादीने ठाणे आणि मुंबईमध्ये आपली पकड मजबूत केली होती. इतक्या वर्षांत त्यांचे शरद पवार यांच्याशीही जवळचे संबंध प्रस्थापित झाले होते. त्यामुळे नाईक यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला फार मोठा धक्का बसणार आहे. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वासाठी कोणता नवा चेहरा देणार याबाबत उत्सुकता आहे.